शिवडीच्या स. गो. पाटकर उद्यानाला मिळणार नवी झळाळी, शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे 10 वर्षे बंद उद्यान सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवडीमधील प्रबोधनकार ठाकरे बस डेपोशेजारील स. गो. पाटकर उद्यान गेल्या 10 वर्षांपासून एसआरए प्रकल्पामुळे बंद ठेवण्यात आले होते. मात्र, शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे आता हे उद्यान सुरू होणार असून त्याला नवी झळाळी मिळणार आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शिवडीतील प्रभाग क्रमांक 206 मधील प्रबोधनकार ठाकरे बस डेपोशेजारी स. गो. पाटकर उद्यान असून हे उद्यान या ठिकाणी होत असलेल्या आझादनगर एसआरए प्रकल्पासाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोकळा श्वास घेण्यासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध होत नव्हते. मात्र, शिवसेनेने यासाठी पाठपुरावा करत नव्याने उद्यानाचे डिझाईन्स करून हे उद्यान सुरू करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी नगरसेवक सचिन पडवळ यांनी पुढाकार घेतला आहे. नुकतेच उद्यानाच्या नव्या आराखडयाबाबत या प्लॉटवर मुंबई पालिका एफ-दक्षिण विभागाच्या साहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर, नगररचना विभाग तसेच एसआरए अधिकारी व विकासक कंपनीच्या वास्तूविशारद यांनी पाहणी केली. उद्यानाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या पुढच्या दोन महिन्यांत घेतल्या जातील व नामवंत उद्यान आर्किटेक्टकडून उद्यानाचा आराखडा बनवला जाईल आणि डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये या उद्यानाच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिली.