नगर जिल्ह्यात 198 शाळा सुरु होणार नाहीत, जिल्हा परिषद प्रशासनाची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्यात ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरात आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होत आहेत. यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक विभागाची लगबग सुरू असताना 10 तालुक्यांतील 69 गावांत कोरोना संसर्गामुळे प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलेले आहे. या गावांत जिल्हा परिषदेच्या 109, तर अन्य व्यवस्थापनाच्या 89 शाळा आहेत. अशा या 198 शाळा कोरोना संसर्ग कमी झाल्याशिवाय सुरू होऊ शकणार नाहीत, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.

राज्यातील अन्य जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना, नगर जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून 500 ते 900 च्या दरम्यान दररोज कोरोनाचे रुग्ण सापडत आहे. गेल्या काही दिवसांपासून काही गावांत मोठय़ा संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने त्या ठिकाणी सात ते चौदा दिवसांचा बंद पाळण्यात येत असून, त्या गावांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. दरम्यान, जिल्ह्यात पाचवी ते बारावीपर्यंतच्या 2 हजार 122 शाळा असून, गुरुवारी जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्रात असणारी गावे आणि शाळांची आकडेवारी शिक्षण विभागाने संकलित केली. यात 14 पैकी 10 तालुक्यांत 69 गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. जिल्हा परिषदेच्या 109, तर अन्य व्यवस्थापनाच्या 89 शाळा आहेत. अशा या 198 शाळा कोरोना संसर्ग कमी झाल्याशिवाय सुरू होऊ शकणार नाहीत. कोरोनामुळे सर्वाधिक प्रतिबंधित क्षेत्रात असणारी गावे ही संगमनेर तालुक्यात 24 असून, पारनेर तालुक्यात 12 आणि श्रीगोंदा तालुक्यात 11 आहेत. तर, अकोले, राहुरी, पाथर्डी आणि जामखेड तालुक्यातील एकही गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेले नाही.

  गावे           बाधित गावे    सुरू न होणाऱया शाळा
संगमनेर             24             71
पारनेर               12             20
श्रीगोंदा              11             18
राहाता                7             24
शेवगाव               4             22
नगर                  4              2
श्रीरामपूर             2             16
नेवासा                2             22
कर्जत                2              2
कोपरगाव            1              1