भातुकलीचा भावस्पर्शी भवताल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>निलय वैद्य

बच्चे कंपनी मोठय़ांचं अनुकरण करतात. लहान मुलांना आई, बाबा, आजी, आजोबा, काका, मामा, मावशी, आत्या यांचं जबर आकर्षण असतं. शाळेतल्या बाईंचं आणि सरांचंही आकर्षण असतं. मुलं त्यांच्यासारखं करतात. छोटय़ा मुली खोटं खोटं पातळ नेसून खोटं खोटं जेवण बनवतात. मुलगे डॉक्टर बनून, सर बनून त्यांची नक्कल करतात. लहान मुलांची ही मानसिकता पाहून खेळणी बनवली जातात. वर्षानुवर्षे ही परंपरा चालू आहे. म्हणून जगभरात भातुकलीची निर्मिती केली जाते. यात जेवणाची भांडी, छोटय़ा छोटय़ा गाडय़ा, डॉक्टर सेट, बाहुली, बाहुला यांचा समावेश असतो. हा विषय लेखिका दीपाली केळकर यांनी निवडला आहे. भातुकली, त्यातले राजा राणी, भांडी या विषयावर संशोधन करून ‘खेळ मांडियेला’ या पुस्तकाची निर्मिती डिंपल पब्लिकेशनच्या नम्रता मुळे यांनी केली आहे. भातुकलीचा नवा कोरा खेळ हाती पडल्यावर लहान मुलं जशी तहान भूक विसरून तो खेळण्यात रममाण होतात तशी काहीशी अवस्था ‘खेळ मांडियेला’ हे पुस्तक हाती पडल्यावर वाचकांची होते. हे पुस्तकाचं यश आहे.

पुण्यात एक भन्नाट व्यक्ती राहते. त्यांचं नाव विलास करंदीकर. त्यांच्याकडे तब्बल तीन हजार भातुकलीची खेळणी आहेत. ते स्वतःला भातुकली प्रेमी, भातुकली संग्राहक म्हणवून घेतात. त्यांचा छंद, त्यांची प्रेरणा, त्यांची जिद्द आणि त्यांचे आयोजन कौशल्य वाखाणण्याजोगं आहे. ते स्वतः आपल्या हाताने भातुकलीची भांडी तयार करतात. त्यामुळे त्यांच्या संग्रहात दिवसेंदिवस भर पडत आहे. त्या भातुकलीच्या वस्तूंचं प्रदर्शन भरवणं हादेखील त्यांच्या छंदाचा भाग, विलास करंदीकरांच्या सहकार्याने, मार्गदर्शनाने दीपाली केळकर यांना या पुस्तकासाठीचं संशोधन करणं सोपं गेलं. स्वतः करंदीकर त्यांची पत्नी अश्विनी आणि सहकारी सुभाष कुलकर्णी यांच्या मनोगताने ‘खेळ मांडियेला’ची सुरुवात होते.

लेखिका दीपाली केळकर यांनी ‘भातुकली’ ही मध्यवर्ती संकल्पना ठेवून तिच्या विविध छटांना स्पर्श केला आहे. गोष्ट भातुकलीच्या राजाची, भातुकली 18 प्रकारची, मान्यवरांच्या नजरेतून भातुकली, संत साहित्य आणि भातुकली, डॉक्टरांच्या दृष्टिकोनातून भातुकली, साहित्यातील भातुकली, गाथा भांडय़ांची असा भातुकलीचा भावस्पर्शी भवताल लेखिकेने तपासला आहे. वाचक तो वाचता वाचता कधी आपल्या बालपणात रमला तर कधी भातुकलीचा आवाका पाहून थक्क होतो.

एका ठिकाणी पुस्तकात भातुकलीच्या भांडय़ांची यादी दिली आहे. विशेष म्हणजे घंगाळ, फणेर पेटी, ओगराळे, वटकन, भगुणं, चंबू, वेडंभांडं, घुसळण खांब, रोवळी, उखळ-मुसळ, डोणी, खापर, कणगी, सोडण, दूध बरणी, अधोळी… या भांडय़ांचे फोटोही पुस्तकात दिले आहेत. ते एकेक करून पाहणं हा एक अनुभव आहे. हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे. तो जतन करण्याचं काम या पुस्तकाच्या माध्यमातून दीपाली यांनी केलं आहे.

‘संत साहित्य आणि भातुकली’ आणि ‘साहित्यातील भातुकली, भांडी आणि इतर खेळ’ ही दोन प्रकरणं ‘खेळ मांडियेला’ला एका वेगळय़ा पातळीवर नेऊन ठेवतात. यात डॉ. रामचंद्र देखणे, अलका मुतालिक, सीमा गोखले यांच्याशी लेखिकेने साधलेला संवाद पुस्तकात मांडला आहे. डॉ. राजेंद्र बर्वे यांनी ‘भातुकली’च्या निमित्ताने लहानग्यांच्या मानसिकतेचा पसारा अचूक शब्दात मांडला आहे. म्हणून दीपाली केळकरांचं ‘खेळ मांडियेला’ हे पुस्तक सर्वांगाने परिपूर्णतेच्या जवळ जाण्याचा यशस्वी प्रयत्न करतं असं म्हणणं अतिशयोक्ती ठरू नये.

खेळ मांडीयेला
लेखिका – दिपाली केळकर
प्रकाशक – डिंपल प्रकाशन
पृष्ठ – 222, मूल्य – रुपये 400/-