साखर सोडा, इथेनॉल करा; नितीन गडकरी यांचा कारखान्यांना सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साखर कारखान्यांनी आता फक्त साखरेवर अवलंबून राहण्याचे दिवस संपले आहेत. आता नवीन साखर कारखान्यांना परवानगी देऊ नये, असे आपले मत झाले आहे. भविष्यात शेतकऱ्यांना समृद्ध करायचे असेल तर इथेनॉल निर्मितीला प्राधान्य द्यावे लागेल, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केले. तसेच महाराष्ट्रातील अर्थकारणाला गती देण्यासाठी जागतिक दर्जाचे रस्ते करण्यासाठी बांधील असल्याचे गडकरी यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत राज्यातील विविध रस्ते व अन्य प्रकल्पांच्या संदर्भात लवकरच बैठक होणार असल्याचे ते म्हणाले.

नगर जिल्ह्यातील 3 राष्ट्रीय महामार्गासह रस्ते विकासकामांचे डिजिटल भूमिपूजन व पूर्ण झालेल्या प्रकल्पाचे लोकापर्ण त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार सुजय विखे, खासदार सदाशिव लोखंडे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, महापौर रोहिणी शेंडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे, आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण काका जगताप, रोहित पवार आदींसह आजी-माजी आमदार, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले की, आज तंत्रज्ञानामध्ये अनेक बदल होत आहेत. ते आपल्याला आता स्वीकारावे लागतील. पेट्रोलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये आज इथेनॉलचा वापर गाड्यांमध्ये केला जात आहे. आपल्या देशातही आता गाड्यांमध्ये 20 टक्के इथेनॉलचा वापर सुरू झाला असला तरी तो 100 टक्के झाला पाहिजे. यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. आज देशामध्ये दोनशे चाळीस लाख टन साखरेची गरज आहे. पण गेल्यावर्षी तीनशे दहा लाख टन साखर तयार केली. त्यामुळे 70 लाख टन जादा साखर झाली. तिला पुरेसा भाव मिळाला नाही. आपल्याला ती इतर देशांमध्ये द्यावी लागली. त्यामुळे साखरेचे रूपांतर आता आपल्याला इथेनॉलमध्ये करण्याची गरज निर्माण झाली आहे. आता साखर तयार करू नका तर इथेनॉल करा, तसेच नवीन साखर कारखान्यांना बंदी आणली पाहिजे, असे आपले मत असल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.

इंधन आयातीवर 12 लाख कोटी रुपये खर्च होतात. वाहनांमध्ये इथेनॉल जर 100 टक्के वापरले गेले तर शेतकऱ्यांचा 5 लाख कोटींचा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा आता आपण पेट्रोलच्या गाडीमध्ये बसणार नाही, तर फक्त इथेनॉलच्या गाडीत बसू, अशी शपथ आपण घेतली पाहिजे. तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू, असे ते म्हणाले. केंद्र सरकारने इथेनॉल 20% पेट्रोलमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला असला तरी आता आपण 100% टाकण्याचा निर्णय घेणार असल्याचेही व तशा गाड्या तयार करण्याचे कंपन्यांना सांगणार असल्याचे ते म्हणाले. कंपन्यांनी तसे केले नाही तर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आता तांदूळ-मका अशा धान्यांपासूनही इथेनॉल तयार करण्याचे काम केले पाहिजे, असे ते म्हणाले. सध्या देशामध्ये 465 कोटी लिटर इथेनॉल तयार केले जाते. तर सोळाशे कोटी लिटरची गरज आहे. तुम्ही इथेनॉल तयार करा, केंद्र सरकार ते विकत घेईल याची हमी देतो असे ते म्हणाले.

देशी गायीचे लिव्हर ट्रान्सप्लांट
पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर कारखान्याबरोबरच दूधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. निश्चितच शेतकऱ्याला त्याचा फायदा मिळाला आहे. पण तंत्रज्ञान बदलत आहे. त्याचा सगळ्यांनीच वापर केला पाहिजे. आता नवीन तंत्रज्ञानाने देशी गीर गायीच्या गर्भाचे ट्रान्सप्लांट करता येईल किंवा लिव्हर बदलता येईल. यामुळे या गायीचे दूध वाढेल, यासाठी हा नवीन विषय आम्ही घेतला आहे . देशी गाई वाढवण्यासाठी हे उद्दिष्ट ठेवत दोनशे देशी गाई तयार करून त्या शेतकऱ्यांना देणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल असे ते म्हणाले.

ते तीन प्रकल्प करणार
दळणवळणाच्या दृष्टीने रस्ते हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. पाणी,वीज, वाहतूक व कम्युनिकेशन यातून रोजगार निर्मिती होते. त्यामुळे हजारो कोटी रुपये आम्ही रस्त्यांच्या संदर्भामध्ये खर्च केले आहेत. मी आता भारत माला- दोन नॅशनल हायवे मंजूर करणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले. राष्ट्रीय महामार्गलगत राज्य सरकारची जमीन आम्हाला मिळाली, तर तेथे लॉजेस्टिक पार्क, इंडस्ट्रीयल क्लस्टर व ट्रान्सपोर्ट नगर मी करून देईल, असे सांगून ते म्हणाले, नगर जिल्ह्यामध्ये 4 हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे हातात घेण्यात आली आहेत. ती पूर्णत्वाला जातीलच पण महत्त्वाकांक्षी असलेला नगर-पुणे हा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, तो मंजूर केला आहे. या महामार्गावरची वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आता वाघोली ते शिरूर या रस्त्यावर तीन मजली उड्डाणपूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर संभाजीनगर ते वाळूज येथे सुद्धा अशाच प्रकारचा तीन मजली उड्डाणपूल करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच तळेगाव-चाकण हा रस्ता जोडण्यासाठी तेथे पूल बांधणार असल्याचेही ते म्हणाले.

तेवढी माफी द्या
आम्ही रस्ते बांधत असताना स्थानिक पातळीवर राज्य सरकारने आम्हाला जीएसटी तसेच गौण खनिजवरील कर माफ करावा, अशी मी राज्य सरकारकडे विनंती केली असल्याचेही गडकरी म्हणाले. दिल्ली ते चेन्नई अंतर कमी होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आता सुरत ते चेन्नई हा नवीन महामार्ग निश्चित केला आहे. तो नगर जिल्ह्यातून जात आहे असे सांगून ते म्हणाले, नगर जिल्ह्यात हा महामार्ग 180 किलोमीटरचा आहे. या मुख्य रस्त्यावर एकूण 50 हजार कोटी रुपये यासाठी आम्ही खर्च करतोय. त्यापैकी नगर जिल्ह्यातील या रस्त्यावर 8 हजार कोटी खर्च होणार आहे, असे ते म्हणाले. या जिल्ह्यांमधून हा महामार्ग जात असल्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा मोबदला निश्चितपणे मिळाला पाहिजे. याबद्दल दुमत नाही. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी जमीन हस्तांतरीत करण्यासाठी आता पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले

पवारांनी केले कौतुक
शरद पवार म्हणाले की, वाहतूक व्यवस्थेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम देशामध्ये गडकरी यांनी केले आहे. सत्तेचा विनियोग देशाच्या विकासासाठी व उभारणीसाठी कसा करता येतो, हे गडकरींनी दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या कोणत्याही राज्यात गेल्यावर रस्ते बघितल्यावर ही गडकरी साहेबांची कृपा आहे, असे अनेकजण सांगतात. रस्ते चांगले झाल्यामुळे दळणवळण वाढले. अर्थकारण सुधारण्यासाठी निश्चित मदत झाली, असे ते म्हणाले. साखर कारखान्यांची आव्हाने आता आगामी काळामध्ये आपल्याला येणार आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आज आधार देणारे पीक ऊस आहे. पाणी चांगले असल्यामुळे आगामी दोन वर्षे उसाचे असतील. आता भविष्यामध्ये एकच पीक न घेता व साखरेवर अवलंबून न राहता नव्या क्षेत्रांमध्ये आता पडले पाहिजे. इथेनॉलमध्ये आपण गेले पाहिजे. साखरेला मर्यादा आहेत. पेट्रोलच्या पुढची स्टेज इथेनॉल नंतर हायड्रोजन आहे, हे पण लक्षात ठेवले पाहिजे. लोकांची त्यादृष्टीने मानसिकता तयार करण्याचे काम गडकरी यांच्या माध्यमातून सातत्याने दिसते, असे ते म्हणाले.

निळवंडेचे श्रेय खासदार लोखंडेना
या कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांचे कौतुक केले. केंद्र सरकारने 40 हजार कोटी सिंचन प्रकल्पांवर खर्च केले आहेत. त्या यादीत निळवंडेचे नाव घेण्यासाठी लोखंडे यांनी आपल्याकडे पाठपुरावा केला, असे गडकरींनी आवर्जून सांगितले

भाजप सरकारचा दोष
यावेळी बोलताना गडकरी यांनी अप्रत्यक्षपणे राज्यातील आधीच्या भाजप सरकारला दोष दिला. राज्यातील महामार्गांची कामे करताना भूसंपादनासाठी एक एकर जागेसाठी 18 कोटी रुपये हा नुकसान भरपाई खर्च परवडणार नाही. आम्ही जास्तीत जास्त बाजारभावापेक्षा दीडपट भरपाई देऊ शकतो. परंतु आधीच्या सरकारने ही भरपाई चारपट केल्याने हा खर्च आवाक्याबाहेर जात आहे, असे त्यांनी सांगत आधीच्या भाजप सरकारला अप्रत्यक्षपणे दोष दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक
गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. शिर्डीच्या विमानतळाच्या सभोवती नवीन शिर्डी शहर वसवण्याचा व स्मार्ट सिटी करण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय चांगला असल्याचे ते म्हणाले. आतापर्यंत महामार्गालगतच्या जमिनी पुढारी घ्यायचे. परंतु आता सरकारने या जमिनी घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधला पाहिजे, असेही गडकरी यांनी सांगितले.