
राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉक्टरांच्या मागण्यांसदर्भात तातडीने योग्य तोडगा काढण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मागण्यांबद्दल सकारात्मक चर्चा झाल्याबद्दल डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेने समाधान व्यक्त करीत संप मागे घेतल्याचे जाहीर केले.
निवासी डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क माफ करणे, पालिकेच्या महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमधून जीएसटी कपात बंद करणे यासंदर्भात मार्डने संप पुकारला होता. या मागण्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शैक्षणिक शुल्कमाफी तसेच जीएसटीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वित्त विभाग तसेच पालिकेस तांत्रिक बाबींचा अभ्यास करून योग्य तो तोडगा काढण्यासाठी त्वरित पावले उचलावी असे सांगितले. त्याचप्रमाणे शासकीय तसेच पालिकेतील निवासी डॉक्टरांनी कोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्दल योग्य ती दखल घेऊन त्यांना कशा प्रकारे प्रोत्साहन देता येईल ते निश्चित करण्याचेही निर्देश दिले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, अतिरिक्त मुख्य सचिव वित्त मनोज सौनिक, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विजय, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी उपस्थित होते.
कोरोना काळात डॉक्टरांचे काम अतुलनीय
कोरोना काळात निवासी डॉक्टरांनी केलेली अतुलनीय कामगिरीसाठी त्यांचे कौतुक करून मुख्यमंत्री म्हणाले की, या डॉक्टरांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढला जाईल. यावेळी मार्डच्या पदाधिकाऱयांनी समाधान व्यक्त केले व राज्य शासन योग्य ती पावले उचलेल असा विश्वास व्यक्त केला.



























































