
राज्य शासनाने 7 ऑक्टोबर 2021 पासून महाराष्ट्रातील सर्व धार्मिकस्थळे खुले करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार श्री साईबाबा समाधी मंदिरात दररोज 15 हजार साईभक्तांना दर्शनाचा लाभ दिला जाणार असून 10 वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रिया, 65 वर्षावरील व आजारी व्यक्ती तसेच मास्क न वापरणाऱ्या साईभक्तांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
दिनांक 7 ऑक्टोबर 2021 रोजीच्या काकड आरतीनंतर समाधी मंदिर दर्शनाकरीता खुले करण्यात येणार असून सकाळी 06.00 ते रात्रौ 10.00 यावेळेत मंदिर खुले राहणार असून दिवसभरात 15 हजार भाविकांना दर्शनाकरीता प्रवेश दिला जाईल. यापैकी 10 हजार ऑनलाईन पास (05 हजार सशुल्क व 05 हजार निशुल्क), व 5 हजार निशुल्क व सशुल्क ऑफलाईन पासेस असतील. प्रत्येक तासाला 1150 साईभक्तांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. साईभक्तांना दर्शनाकरीता online.sai.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन दर्शन पासेची बुकींग करावी लागेल.
दर्शन पासेस वरील नमुद वेळे प्रमाणेच (स्लॉट नुसार) भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार असून नमुद वेळेचे 15 मिनीटे अगोदर प्रवेशव्दारावर उपस्थित रहावे. तसेच सर्व साईभक्तांनी व ग्रामस्थांनी संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन ही बानायत यांनी केले.




























































