तब्बल 35 दिवस उशिराने उजनी शंभर टक्के भरले, पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेली यशवंत सागर जलाशय म्हणजे उजनी धरण आज रात्री 100 टक्के भरले आहे. गतवर्षीच्या तुलनेत धरण भरण्यास 35 दिवस जास्त लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा व शेतीचा प्रश्न मिटला आहे. उजनी धरण परिसरात व पुण्यात झालेल्या पावसामुळे धरण 100 टक्के भरण्यास साहाय्य झाले असून, 110 टक्क्यांकडे वाटचाल सुरू आहे.

गेल्या आठ दिवसांपासून उजनी धरणात संथगतीने पाण्याचा विसर्ग सुरू होता. गेल्या दोन दिवसांपासून पुणे आणि उजनी जलाशय काठावरील भागात जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे दौंड व बंडगार्डन येथून विसर्ग वाढविण्यात आला होता. सध्या दौंड येथून 7163 क्युसेक्सने विसर्ग असून, पुण्यातील पावसामुळे बंडगार्डन येथून विसर्ग वाढविण्यात आला आहे. मंगळवारी रात्री 9 वाजता उजनी धरण शंभर टक्के भरले. सध्या एकूण पाणीसाठा 3310.93 दलघमी असून, उपयुक्त पाणीसाठा 1510.32 दलघमी आहे. पावसामुळे दौंड व बंडगार्डन येथून विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे.

मागीलवर्षी 31 ऑगस्ट रोजी उजनी धरण शंभर टक्के भरले होते. मात्र, यंदाच्या वर्षी उजनी धरण शंभर टक्के भरण्यास तब्बल 35 दिवस उशिराने भरले आहे. जूनच्या सुरुवातीला उजनीतील पाणीपातळी वजा 22 टक्के होती. जुलैअखेर पाणीपातळी 50 टक्के होती. त्यामुळे यंदाच्या वर्षी उजनी शंभर टक्के भरते की नाही, अशी चिंता होती. मात्र, पुणे, उजनी जलाशय काठ व भीमा खोऱ्य़ात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे उशिरा का होईना अखेर उजनी धरण शंभर टक्के भरले आहे.