
अंगणात खेळत असताना बेपत्ता झालेल्या चुमकल्याचा मृतदेह दोन दिवसांनी घरापासून शंभर मीटरवर आढळून आल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील कापशी गावात आज घडली आहे. मृतदेहावर हळद, कुंकू व गुलाल आढळून आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. आरव राकेश केसरे (वय 5) असे या बालकाचे नाव आहे.
आरव रविवारी सायंकाळी मित्रांसह अंगणात खेळत असताना साडेसहानंतर तो अचानक बेपत्ता झाला होता. शोध घेऊनही रात्री उशिरापर्यंत तो न सापडल्याने नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्याचा सर्वत्र शोध घेतला जात होता. मात्र, आज पहाटे घरापासून शंभर मीटर अंतरावरच त्याचा मृतदेह आढळला. गळा दाबून खून करण्यात आल्याचे दिसून येत होते. शिवाय मृतदेहावर हळद, कुंकू आणि गुलाल टाकण्यात आल्याचे आढळल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते.
कागलमधील खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट
महिनाभरापूर्वी कागल तालुक्यात अपहरणातून बालकाचा खून झाला होता. नरबळीतून खून झाल्याची त्यावेळी चर्चा झाली होती. एकाला अटकही करण्यात आली असून, अजूनही त्या खुनाचे कारण स्पष्ट झाले नाही. त्यात आरवच्या खुनामुळे या घटनेचा तपास त्वरित करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्य़ांनी पाहणी केली आहे.



























































