तुझ्या दर्शना अधिर देवा! सात महिन्यांनंतर आजपासून प्रत्यक्ष दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेले ‘देवाचे द्वार’ उद्या 7 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर भाविकांसाठी उघडणार आहे. त्यामुळे देवाच्या प्रत्यक्ष दर्शनाची आस लागून राहिलेल्या भक्तांना डोळे भरून देवाला पाहता येणार आहे. मात्र अजूनही कोरोनाचे सावट असल्यामुळे आवश्यक खबरदारी घेणे पालिकेने बंधनकारक केले आहे. एकूण क्षमतेच्या 50 टक्के भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करून गर्दीचे काटेकोरपणे नियोजन करावे, सॅनिटायझेशन आणि मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोणत्याही ठिकाणी कोरोना खबरदारीचे नियम मोडल्याचे निदर्शनास आल्यास साथरोग कायद्यानुसार कठोर कारवाई होणार असल्याचेही पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर काही दिवसांत लागलेल्या लॉकडाऊनमुळे मंदिर आणि प्रार्थनास्थळे देवाच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी बंद करण्यात आली.

सुमारे वर्षभराने कोरोनाची पहिली लाट आटोक्यात आल्यानंतर काही दिवस मंदिरे-प्रार्थनास्थळे सुरू करण्यात आली होती. मात्र फेब्रुवारीच्या मध्यावर कोरोनाची दुसरी मोठी लाट सुरू झाल्याने पुन्हा काही दिवसांतच प्रत्यक्ष दर्शन बंद करण्यात आले. त्यामुळे कोरोना आल्यापासून तब्बल दीड वर्षाने अनेकांना प्रत्यक्ष दर्शन घेता येणार आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनांनी मंदिराचे सॅनिटायझेशन आणि सुरक्षित अंतर यासह कोरोना खबरदारी घेण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.

गरब्याला बंदी

z मुंबईसह राज्यभरात कोरोना आटोक्यात असला तरी अजूनही दररोज शेकडो रुग्ण आढळत असल्यामुळे धोका टाळण्यासाठी सलग दुसऱया वर्षीही गरब्याला बंदी घालण्यात आली आहे. मंडळांनी गर्दी न करता साधेपणाने उत्सव साजरा करावा, सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य शिबिरे आणि समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शक्यतो ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

महालक्ष्मी मंदिर

दर्शनाची वेळ ः सकाळी 6 ते रात्री 9
आरती – सकाळी 7 वाजता
बुकिंग – गुरुवारसाठी 492 भाविकांचे बुकिंग
संकेतस्थळ ः www.mahalakshmitemplemumbai
मुंबादेवी मंदिर
दर्शनाची वेळ ः सकाळी 7 ते संध्या 6
आरती ः सकाळी साडेनऊ वाजता
बुकिंग ः गुरुवारसाठी 100 पेक्षा जास्त नोंदणी
संकेतस्थळ ः www.mumbadevi.org.in

वृद्ध, लहान मुलांना प्रवेश नाही

z मंदिरात 10 वर्षांखालील मुले, 65 वर्षांवरील वृद्ध ,गर्भवती महिलांना प्रवेश दिला जाणार नाही. मास्कशिवाय या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांमध्ये 6 फुटांचे अंतर आवश्यक. हार, फुले, नारळ, पूजेचे साहित्य स्वीकारले जाणार नाही. शिवाय प्रसादही दिला जाणार नाही. बुकिंग केलेल्या व्यक्तीला मंदिराच्या प्रवेशद्वारावर आधारकार्ड दाखवून पूर्ण शहानिशा झाल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे.

लांबूनच दर्शन, गाभाऱयात प्रवेश नाही

n मंदिर, प्रार्थनास्थळे खुली होत असली तरी भाविकांना दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग करावे लागणार आहे.
n मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक, महालक्ष्मी, मुंबादेवी मंदिरांमध्ये दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग बंधनकारक.
n मंदिराच्या गाभाऱयात भाविकांना प्रवेश दिला जाणार नसून लांबून मुखदर्शन घेता येणार आहे.
n कंटेंमेंट झोन नसलेल्या ठिकाणचीच मंदिर-प्रार्थनास्थळे उघडणार.

सिद्धिविनायकाचे आठवडय़ाचे बुकिंग तीन तासांत फुल्ल

कोरोनामुळे गेल्या सात महिन्यांपासून सिद्धिविनायकाची गाठभेट न झालेल्या भाविकांसाठी आज दुपारी 12 वाजल्यापासून दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग सुरू झाले. आठवडाभरासाठी बुकिंग सुरू होताच 12 ते 3 या तीन तासांत सिद्धिविनायकाची आठवडाभराची बुकिंग फुल झाली. भाविकांसाठी दर्शनाची वेळ सकाळी 7 ते रात्री 7 अशी असून पहाटे नेहमीप्रमाणे साडेपाच वाजता आरती होणार आहे. त्याचबरोबर दर्शनाला सुरुवात होताच नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी नवचंडी होम केला जाणार आहे. गुगल आणि ऍपलवरून डाऊनलोड केलेल्या sidhivinayak-temple या ऍपवर बुकिंग सुरू आहे. दरम्यान, भाविकांना घरबसल्या ऑनलाईन दर्शनाची सुविधाही या ऍपवरून करून देण्यात आली आहे.