
हिंदुस्थानची युवा नेमबाज मनू भाकर हिची जागतिक ज्युनियर नेमबाजी चॅम्पियनशिपमधील सुवर्ण कामगिरी सुरूच राहिली. तिने येथे सुरू असलेल्या या प्रतिष्ठsच्या स्पर्धेत चौथ्या सुवर्ण पदकाला गवसणी घातली. मनू भाकर हिने रिदम सांगवान व नाम्या कपूर यांच्या साथीने 25 मीटर पिस्तोल टीम इव्हेंटमध्ये सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली. हिंदुस्थानने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये नऊ सुवर्ण, आठ रौप्य व तीन कास्य पदके पटकावली असून गुरुवारी संध्याकाळपर्यंत पदकतालिकेत पहिले स्थानही कायम राखले आहे.
अमेरिकेचा धुव्वा
हिंदुस्थानच्या महिला नेमबाज संघाने 25 मीटर पिस्तोल टीम प्रकारात अमेरिकेन संघाचा धुव्वा उडवला आणि सुवर्ण पदकावर हक्क सांगितला. मनू भाकर, रिदम सांगवान व नाम्या कपूर यांचा समावेश असलेल्या हिंदुस्थानच्या महिला संघाने अमेरिकन संघावर 16-4 अशा फरकाने दणदणीत विजय साकारला. मनू भाकरचे हे या स्पर्धेतील चौथे सुवर्ण पदक ठरले. तिने चार सुवर्ण पदकांसह एक कास्य पदकही पटकावले आहे. तसेच नाम्या कपूर हिने आतापर्यंत दोन सुवर्ण पदकांवर नाव कोरले आहे. आदर्श सिंगने पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तोल प्रकारात रौप्य पदक पटकावले.
पुरुषांच्या ट्रप प्रकारात रौप्य पदक
हिंदुस्थानच्या पुरुषांच्या संघाचे सुवर्ण पदक हुकले. बख्तयारुद्दीन मालेक, शार्दुल विहान व विवान कपूर या हिंदुस्थानच्या खेळाडूंना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. हिंदुस्थानच्या खेळाडूंनी 525 गुणांपैकी 473 गुणांची कमाई केली. इटलीच्या संघाने 486 गुणांसह पहिले स्थान पटकावले. महिला गटात किर्ती गुप्ता, आद्या त्रिपाठी व दिव्या सिंग यांना पदकापासून दूरच रहावे लागले.





























































