सरकारकडून अपेक्षा, लोकांसाठी काहीतरी करा! मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांवर हायकोर्टही नाराज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रतिंद्र नाईक

मुंबईत बिल्डरांमार्फत पुनर्विकासासाठी हाती घेण्यात आलेले प्रकल्प रखडले असून भाडेकरूंना विकासकाकडून मिळणारे भाडेही मिळेनासे झाले आहे. बिल्डरकडून मिळणाऱया भाडय़ाअभावी अनेक कुटुंबीयांचे जगणे मुश्कील झाले असून प्रकल्प मार्गी लागण्यासाठी रहिवाशांनी राज्य सरकार तसेच मुंबई उच्च न्यायालयाला साकडे घातले आहे. मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांवर हायकोर्टानेही तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्वसामान्यांच्या व्यथा दूर करण्यासाठी आम्हाला केवळ सरकारकडून अपेक्षा आहेत. त्यामुळे लोकांसाठी काही तरी करा असे स्पष्ट करत न्यायालयाने याप्रकरणी थेट पेंद्र सरकारला उद्या शुक्रवारी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

दादरच्या गोखले रोड येथील आर. के. बिल्डिंगच्या पुनर्विकासाचा प्रकल्प खासगी विकासकाने हाती घेतला. इमारतीतील रहिवासी दुसऱया ठिकाणी भाडय़ाने राहण्यास गेले, मात्र मार्च 2014 सालापासून इमारतीच्या पुनर्विकासाचे काम बंद पडले. विकासकाकडून मिळणारे भाडेही बंद झाल्याने रहिवाशांनी सदर जागा म्हाडाने ताब्यात घेऊन ती विकसित करावी या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी घेण्यात आली. याचिकेची गंभीर दखल घेत खंडपीठाने राज्य सरकारला याबाबत विचारणा केली. त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने अॅड. हेमंत हरियाण यांनी बाजू मांडताना खंडपीठाला सांगितले की, शासनाला इच्छा असूनही कायद्यानुसार सदर जागा ताब्यात घेऊन पुनर्विकासाचा प्रकल्प मार्गी लावता येणे शक्य नाही. रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी व जागा ताब्यात घेण्यासाठी शासनाकडून म्हाडाच्या कलम 91 (अ) या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे.

सरकारच्या दोन्ही सभागृहाने त्याला मंजुरीही दिली आहे. केवळ राष्ट्रपतींची संमती त्याला मिळणे आवश्यक असून सरकार त्यासाठी प्रयत्नशील आहे. या युक्तिवादावर खंडपीठाने पेंद्र सरकारची याबाबत नेमकी भूमिका काय, राष्ट्रपतींची याला संमती केव्हा मिळणार याबाबत विचारणा केली. मात्र या प्रकरणात पेंद्र सरकार प्रतिवादी नसल्याचे अॅड. हरियाण यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायालयाने याची दखल घेत पेंद्राला प्रतिवादी केले व अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांना शुक्रवार, 8 ऑक्टोबर रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देत सुनावणी तहकूब केली.

दादर, माहीमसह मुंबईच्या इतर भागातही तीच परिस्थिती

आर. के. इमारतीत राहणारे रहिवासी व याचिकाकर्ते नवीन गुप्ता यांच्या इमारतीत 93 भाडेकरू असून विकासकाकडून 2014 सालापासून भाडे थकले आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अशीच स्थिती दादरमधील छप्रा आणि मोहसीन इमारतीची झाली असून विकासकाकडून इमारतीचे काम अनेक वर्षांपासून लटकले आहे. हीच स्थिती मुंबईतील इतर भागांची असून रखडलेल्या पुनर्विकासाच्या प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात अनेक रहिवाशांनी दाद मागण्यासाठी धाव घेतली आहे.