मुंबईत मजबूत रस्त्यांसाठी 1127 कोटींच्या फेरनिविदा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत मजबूत रस्त्यांसाठी पालिकेने 1127.63 कोटी रुपयांच्या फेरनिविदा मागवल्या आहेत. रस्ते दुरुस्तीसाठी याआधी मागवलेल्या निविदा तब्बल 30 टक्के कमी दराने आल्याने दर्जेदार काम कसे होणार, असा प्रश्न निर्माण झाल्याने फेरनिविदा मागवण्यात आल्या असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईत दर्जेदार करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून रस्ते विभागाकडून 1200 कोटींच्या निविदा मागविण्यात आल्या. यानुसार या कामांसाठी निविदा सादर केलेल्या कंत्राटदारांनी थेट 30 टक्के कमी दराने निविदा सादर केल्या. त्यामुळे रस्ते दर्जेदार कसे होणार, असा प्रश्न स्थायी समितीत उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे आता या निविदा नव्याने मागविण्यात आल्या आहेत. या महिनाअखेरपर्यंत निविदा विक्री सुरू राहणार आहे. त्यानंतर निविदा स्वीकारणे, त्याची पडताळणी करणे, अंतिम निविदाकार ठरवून महानगरपालिकेकडून मंजुरी घेणे यासाठी किमान दोन-अडीच महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

असा होणार खर्च

  • पश्चिम उपनगर 620 कोटी 58 लाख
  • पूर्व उपनगर 401 कोटी 96 लाख
  • शहर 104 कोटी 8 लाख

असे आहे रस्त्यांचे नियोजन

  • मजबूत, टिकाऊ, खड्डेमुक्त रस्त्यांसाठी यापुढे 6 फुटांवरील सर्व रस्ते सिमेंट-काँक्रीटचे करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. डांबराचे रस्त्यावर बिटुमनच्या गुणधर्मानुसार पावसाळ्यात पाण्याच्या संपर्कामुळे नियमितपणे खड्डे पडण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे असे धोरण आखण्यात आले आहे. पालिकेचे 2 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत.
  • यात साधारण पाच हजार रस्ते आहेत. यामध्ये 147 किमीचे प्रकल्प रस्ते आणि दोष दायित्व कालावधीतील 625 किमी असे 772 किमी रस्त्याचे परिरक्षण होण्यासाठी कंत्राटदार आणि मध्यवर्ती यंत्रणेच्या माध्यमातून काम सुरू आहे. याशिवाय इतर 1087 किमी लांबीच्या रस्त्यांबाबत प्रशासनाच्या माध्यमातून कार्यवाही सुरू आहे.