
कश्मिरी पंडित आणि शीख समाज सध्या दहशतवाद्यांच्या लक्ष्यावर आहे. जम्मू-कश्मीरच्या श्रीनगरमधील ईदगाह भागात गव्हर्नमेंट बॉईज सेकंडरी स्कूलमध्ये घुसून दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात मुख्याध्यापक सुपिंदर कौर आणि दीपक चांद या शिक्षकाचा मृत्यू झाला. सुपिंदर हे शीख समाजाचे तर दीपक चांद हे कश्मीरी पंडित होते. दहशतवाद्यांकडून नागरिकांची हत्या करण्याची आठवडाभरातील ही सातवी घटना आहे.
श्रीनगरमधील या घटनेनंतर सुरक्षा दलाने घटनास्थळी पोहोचून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. कश्मीरमधील सामाजिक एकता संपवण्यासाठीच निःशस्त्र नागरिकांचे बळी घेऊन स्थानिक मुस्लिमांना बदनाम केले जात आहे, असे जम्मू-कश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितले. कश्मीरमधील 370 कलम रद्द झाल्यानंतर दहशतवाद्यांमध्ये निराशा पसरली आहे आणि ते शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांचे प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असे सिंह यांनी सांगितले.
पाच दिवसांत 7 नागरिकांची हत्या
z पाच दिवसांत दहशतवाद्यांनी कश्मीरमध्ये 7 नागरिकांची हत्या केली. मंगळवारी पहिल्या घटनेत 68 वर्षीय फार्मासिस्ट माखनलाल बिंद्रू यांची मेडिकल स्टोअरमध्ये घुसून गोळ्या घालून हत्या केली गेली. दुसऱया घटनेत लाल बाजार भागात वीरेंद्र पासवान या पाणीपुरी विक्रेत्याची हत्या झाली तर तिसऱया घटनेत बांदीपोरा भागात मोहम्मद शफी लोन या नागरिकाची दहशतवाद्यांनी क्रूर हत्या केली. गेल्या शनिवारी कारा नगरमध्ये अब्दुर्रहमान गुरू तर श्रीनगरच्या एसडी कॉलनीत मोहम्मद शफी दार याची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली.





























































