
तीव्र पाणी टंचाईच्या काळात तालुक्यातील जनतेसाठी जीवनदायीनी ठरणारा मांडओहळ मध्यम प्रकल्प आज पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला. सलग तिसऱया वर्षी मांडओहोळ धरण भरल्याने तालुक्याच्या उत्तर भागातील शेतकऱयांसह तालुकावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मांडओहळ प्रकल्पची एकूण साठवण क्षमता 399 दशलक्ष घनफूट, तर उपयुक्त साठा 310 दशलक्ष घनफूट आहे. पळसपूर, नांदुरपठार, सावरगाव परिसरासह मांडओहळ प्रकल्पाच्या पाणलोटक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धरणात आजअखेर 399 पैकी 380 दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या वर्षी 20 ऑगस्ट रोजी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. यावर्षी मात्र पावसात सातत्य नसल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत मांडओहळ दीड महिना उशिराने भरले. धरण भरून वाहू लागल्याने शेतकऱयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कान्हूर पठारासह एकोणीस गावांची पाणीपुरवठा योजना मांडओहळ धरणातून राबवण्यात आली आहे. पाणीटंचाईच्या काळात, दरवर्षी साधारण एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मांडओहळ धरणातील पाण्यावर अवलंबून रहावे लागते. या काळात तालुक्यातील बहुतांश गावांच्या पाणी योजनांचे उद्भव कोरडे पडतात. त्यामुळे मांडओहोळ धरणातून तालुक्यातील गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो.
तालुक्यातील ढवळपुरी परिसरातील काळू प्रकल्प 15 दिवसांपूर्वी पूर्ण क्षमतेने भरला आहे, तर समाधानकारक पावसामुळे इतर मध्यम प्रकल्पही भरण्याच्या मार्गावर आहेत. पारनेर शहर व हंगे गावाला पाणीपुरवठा करणाऱया हंगे तलावात अद्यापि पाण्याची समाधानकारक आवक झाली नाही.
तीन वर्षांपूर्वी मांडओहोळच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पाठ फिरवल्याने धरणात नवीन पाण्याची आवक झाली नव्हती. एप्रिल 2019 मध्ये धरणातील सर्व पाणी संपल्याने धरण कोरडे पडले होते. त्यामुळे परिसरातील शेतकऱयांनी धरणातील साचलेला गाळ वाहून नेला. त्यामुळे धरणाची खोली वाढण्यासह साठवण क्षमतेतही वाढ झाली आहे.
पर्यटकांनी काळजी घेणे आवश्यक, सर्वसाधारणपणे सलग दोन वर्षे मांडओहळ
धरण पूर्ण क्षमतेने भरत नाही. हा आजवरचा अनुभव आहे. मात्र, 2019 साली 20 ऑगस्ट, 2020 साली 21 ऑगस्ट आणि यावर्षी 7 ऑक्टोबर रोजी धरण भरले. धरण परिसराबरोबरच जवळच असलेला रुईचोंढा धबधबा नगरसह पुणे जिल्ह्यातील पर्यटकांसाठी पर्वणी ठरतो. गेल्या वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध झुगारून पर्यटकांनी धरण परिसरात मोठी गर्दी केली होती. गेल्या वर्षी रुईचोंढा धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पाच पर्यटकांचा विविध घटनांमध्ये धबधब्याखाली असलेल्या डोहात बुडून मृत्यू झाला होता. काही वर्षांपूर्वी नगर येथील वैद्यकीय व्यवस्थापन क्षेत्रातील पाटील यांचा सांडव्यासमोरील निसरडय़ा जागेवरून घसरल्याने दरीत पडून मृत्यू झाला होता. अशा घटना टाळण्यासाठी पर्यटकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.























































