उजनी धरण 108 टक्क्यांवर; जोरदार पावसाने पाणीपताळीत वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेले उजनी धरण 108 टक्के भरले असून दौंड येथून 8116 तर बंडगार्डन येथून 2916 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पुण्यात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातून पाच हजार क्युसेकने भीमा नदीपात्रात रात्री उशीरा पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

जुलैमध्ये 50 टक्क्यांवर असलेल्या उजनी धरणाने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात शंभरी पार केली आहे. उजनी धरणावर, पाणलोट क्षेत्रात व पुण्यात झालेल्या जोरदार पावसामुळे उजनीच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ झाली. शनिवारी सायंकाळपर्यंत दौंड येथे भीमा नदीला येणारा विसर्ग आठ हजार क्युसेकहून अधिक असून, आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सध्या उजनी धरण 108 टक्के भरले आहे. दौंड येथून विसर्ग सुरू असून, पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत उजनी 110 टक्के पार करेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, पुणे शहरासह पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून त्यामुळे उजनी धरणात दौंडहून 8116 क्युसेकने, तर बंडगार्डन येथून 2916 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा 57.60 टीएमसी झाला असून, एकूण पाणीपातळी 497.17 मीटर झाली आहे. उजनी धरण व्यवस्थापन सतर्क झाले आहे. रात्री नऊ वाजता उजनी धरणातून पाच हजार क्युसेकने भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे.