15 ऑक्टोबरला डिजिटल अभिवाचन स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

15 ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त अधिकाधिक लोकांना वाचनाची गोडी लागावी यासाठी मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मिती क्रिएशन या संस्थांच्या वतीने डिजीटल अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 10 ऑक्टोबरपासून या स्पर्धेची सुरुवात होणार असून स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकांनी मराठी साहित्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या ललित लेखांचे वाचन करायचे आहे. या अभिवाचनाचा 3 ते 5 मिनिटांचा व्हिडीओ स्पर्धकांनी पाठवायचा आहे.

5 ते 15 वयोगट, 15 ते 30 आणि 30 वर्षांपुढील वयोगट अशा तीन गटात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धकांनी आपले व्हिडीओ [email protected] यावर इमेल पाठवायचे आहेत. व्हिडीओ पाठविण्याची शेवटची तारिख 12 ऑक्टोबर आहे, असे राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांनी स्पष्ट केले. या स्पर्धेच्या निमित्ताने 11 ऑक्टोबरला फेसबुक लाईव्ह सेशन होणार असून अभिवाचनाविषयी ज्येष्ठ दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, अभिनेता चिन्मय केळकर, श्रीनिवास नार्वेकर, निवेदिका उत्तरा मोने मार्गदर्शन करणार आहेत. संपर्क – 9930115759.