
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी 485 झाडे कापण्यात येणार आहेत. मात्र या झाडांच्या बदल्यात 1076 झाडेही नव्याने लावण्यात येणार असून 179 झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहेत. याबाबत वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत दहा प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.
मुंबईत कोणत्याही प्रकल्पासाठी झाडे कापावी लागत असल्यास पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी अनिवार्य आहे. तर एकाच कामासाठी 200 हून जास्त झाडे कापायची असल्यास राज्य सरकारची परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे. यानुसार 200 पेक्षा झाडे कापण्याचे दोन प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचेही यशवंत जाधव म्हणाले. आज झालेल्या बैठकीत रेल्वे, एमएमआरडीए, मेट्रो, राज्य सरकारच्या अखत्यारीमधील एकूण 22 प्रस्ताव मांडण्यात आले. यातील दहा प्रस्ताव मंजूर करण्यात आले, तर दोन प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आले. मुंबईतील झाडे वाचवण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकल्पात जास्तीत जास्त झाडे वाचवणे किंवा पुनर्रोपित करण्याचे निर्णय घेतले जात असल्याचेही यशवंत जाधव म्हणाले.
बैठकीत मांडलेले महत्त्वाचे प्रस्ताव
- वडाळा ते ठाणेपर्यंतच्या मेट्रोच्या चौथ्या टप्प्यासाठी घाटकोपर येथे 133 झाडे कापणे आणि 108 झाडांचे पुनर्रोपण करणे, विक्रोळी येथे 105 झाडे कापणे आणि 39 झाडांचे पुनर्रोपण करण्याचे प्रस्ताव मांडण्यात आले होते.
- तर दोन-बी प्रकल्पांसाठी अंधेरी पश्चिम येथे 41 झाडे कापणे आणि 145 झाडे पुनर्रोपित करण्याचा प्रस्ताव आहेत. शिवाय मेट्रोच्या तिसऱया टप्प्याअंतर्गत विधान भवन स्थानकाच्या बांधकामासाठी 24 झाडे कापणे आणि 17 झाडे पुनर्रोपित करण्याचा प्रस्ताव आहे.
- पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी ते राममंदिरदरम्यान प्रस्तावित पुलासाठी 9 झाडे कापणे, 57 पुनर्रोपित करणे, अंधेरी ते आंबोली दरम्यानच्या प्रस्तावित पुलासाठी 35 झाडे कापणे आणि 15 झाडे पुनर्रोपित करणे.
- सांताक्रुझ ते खारदरम्यान सहाव्या मार्गाच्या विस्तारासाठी 18 झाडे कापणे आणि 27 झाडे पुनर्रोपित करण्याचे प्रस्ताव मांडण्यात आले. तर कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसच्या कोचिंग लाइनच्या बांधकामासाठी 114 झाडे कापणे आणि 32 झाडांच्या पुनर्रोपण असे प्रस्ताव मांडण्यात आले. यातील 485 झाडे कापणे तर 179 पुनर्रोपित करण्याचा निर्णय घेण्यात आला.





























































