
सोलापूर जिल्ह्यच्या करमाळा तालुक्यातील ढोकरी येथील उजनी जलाशयात वाळू उपसा करणाऱ्य़ा टोळीवर ग्रामीण पोलीस व महसूल विभागाने कारवाई करत 12 लाखांचे साहित्य जप्त केले आहे. यातील आरोपी फरार आहेत.
उजनी जलाशय व भीमा-सीना नदीच्या काठावर वाळूतस्कर अत्याधुनिक बोटींनी वाळूचा उपसा करत आहेत. सोमवारी करमाळा तालुक्यातील ढोकरी येथील उजनी जलाशयात बोटीद्वारे वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पेट्रोलिंग करणाऱ्य़ा पोलिसांना मिळाली. त्यांनी यासंबंधी वरिष्ठांना माहिती दिली असता पोलीस व महसूल विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन छापा घातला असता, उजनी जलाशयालगत यांत्रिक बोटीच्या साहाय्याने वाळू उपसा होत असल्याचे दिसून आले. पोलीस व महसूल पथकाला पाहताच बोटचालक, मालक व कामगार पळून गेले. कारवाई करणाऱ्य़ा पथकाने यांत्रिक बोट व वाळू जप्त केली. सुमारे 12 लाख 30 हजार रुपये किंमतीचा हा मुद्देमाल होता. सदरचे यांत्रिक बोट व वाळू पाण्यात बडवून नष्ट करण्यात आले. सदरची बोट बाळू भगत याची असल्याची प्राथमिक माहिती तपासात निष्पन्ना झाली आहे. भगत व त्याच्या साथीदाराविरुद्ध करमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक कोकणे व तहसिलदार माने, केमचे मंडल अधिकारी खटाव, कोठकरीचे तलाठी वायनेवाड व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.






















































