तीन खाड्यांचा संगम – करजुवे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आशुतोष बापट

तीन खाडय़ांच्या आणि चार तालुक्यांच्या संगमावर वसलेल्या करजुवेला निसर्गाने भरभरून सौंदर्य बहाल केलं आहे. इथल्या निसर्गाची विविध रंगांची उधळण पाहात केलेली भटकंती नक्कीच समृद्ध होते.

कोकणची रचना खूप वेगळी आणि वैशिष्टय़पूर्ण आहे. सह्याद्रीच्या अनेक उपरांगा पश्चिमेकडे पसरल्या असल्यामुळे कोकणचा सगळा प्रवास हा चढ-उताराचा झालेला आहे. या रांगांवर उगम पावलेल्या नद्या पश्चिमेकडे सिंधू सागराला जाऊन मिळतात. नद्यांची लांबी कमी असली तरी त्यांचा प्रवास हा वळणावळणाचा आणि खूप सुंदर असतो. आपल्या भटकंतीमध्ये अनेकदा या नद्या, खाडय़ा आडव्या येत असतात. अनेक ठिकाणी आता या नद्यांवर पूल बांधलेले आहेत, तर अजूनही काही ठिकाणी नदीच्या एका काठावरून पलीकडे जाण्यासाठी होडीचा वापर होतो. खरे तर कोकण म्हटले की, शांत निवांत खाडीतून जाणारी होडीच डोळ्यासमोर येते. ही होडी उलटू नये म्हणून काही ठिकाणी या होडीच्या बाजूला दोन लाकडी दांडय़ा बसवून त्यांच्या पुढे होडीला समांतर एक आडवी लाकडी फळी बांधतात. कोकणात याला ‘उंडली’ म्हणतात आणि खाडी पार करणाऱया या होडीला ‘तर’ असे म्हणतात. अतिशय माफक दरात या तरीतून आपण पलीकडच्या काठावरील गावात जाऊ शकतो. संगमेश्वर तालुक्यातील करजुवे या गावची तर विविध गोष्टींनी वैशिष्टय़पूर्ण झालेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे इथे समोरच्या काठावर असलेल्या भातगावला जाता येते. हा झाला एक भाग, पण करजुवे गावाचे स्थान अगदी मोक्याचे असल्यामुळे इथल्या नौकाविहाराला जास्त महत्त्व प्राप्त होते. संगमेश्वरहून करजुवे येथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक मार्ग संगमेश्वर-धामणी-तुरळ-गोळवली मावळंगे तिठा-धामापूर-आरवली डिंगणी तिठामार्गे करजुवेला जातो. हे अंतर 32 कि.मी. इतके आहे. दुसरा रस्ता संगमेश्वर-आसुर्डे-डिंगणी पूल-पिरंदवणे-करजुवे असा आहे. हे अंतरसुद्धा अंदाजे 35 कि.मी. आहे.

या करजुवे गावाचे भौगोलिक स्थान अगदी मोक्याचे आहे. फारच थोडय़ा गावांना असे स्थान प्राप्त होते. आपण अनेकदा तीन नद्यांचा संगम झालेला पाहतो. त्याला त्रिवेणी संगम असेही संबोधले जाते. धार्मिकदृष्टय़ादेखील या त्रिवेणी संगमाला विशेष महत्त्व आहे, पण करजुवे येथे तीन खाडय़ांचा संगम झालेला आहे. खाडी म्हणजे खरे तर नदीच असते, मात्र समुद्राच्या जवळ गेल्यावर त्या नदीचे पाणी गोड राहात नाही तर त्यात समुद्राचे पाणी मोठय़ा प्रमाणावर मिसळल्यामुळे ते खारे झालेले असते. त्यामुळे त्या नदीला पुढे खाडी असे म्हटले जाते. करजुवे येथून समुद्र जवळ असल्यामुळे येथे असलेल्या तीन खाडय़ा महत्त्वाच्या ठरतात. अबलोलीवरून येणारी कापशी नदी आणि आरवलीवरून येणारी गडनदी यांचा संगम करजुवे येथे होतो आणि येथून लगेचच पुढे या दोन्ही नद्या मिळून संगमेश्वरवरून येणाऱया शास्त्राr नदीला मिळतात आणि त्यानंतर पुढे ही शास्त्री नदी जयगडपाशी समुद्राला जाऊन मिळते. तिथे तिला जयगडची खाडी म्हटलेले आहे.

कापशी, गड आणि शास्त्री अशा तीन खाडय़ांचा हा अनोखा संगम आपल्याला करजुवे येथे बघायला मिळतो. करजुवे हे ठिकाण अत्यंत शांत-निवांत असे आहे. कसलाही आवाज नाही. समोर खाडीचे निवळशंख पाणी, त्यात असलेले विविध मासे, क्वचित एखादी होडी इकडून तिकडे चाललेली असे हे सगळे रमणीय दृश्य असते. इथल्या तरीवर उभे राहिले की आपल्या चारही बाजूंनी डोंगराचा गराडा पडलेला दिसतो. इथले अजून एक भौगोलिक वैशिष्टय़ म्हणजे आपण चार तालुक्यांच्या सीमेवर उभे असतो. करजुवेपाशी गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि संगमेश्वर हे चार तालुके एकत्र येतात.

तीन खाडय़ा आणि चार तालुक्यांच्या संगमावर असलेले हे आगळेवेगळे ठिकाण करजुवे आपल्या भटकंतीमध्ये अवश्य समाविष्ट करून घ्यायला हवे. ‘संतोष महांकाळ’ हे इथल्या ‘तर’वाल्याचे नाव. तो इथेच असतो. इथे नसला तर समोरच्या तीरावर तो असतो. करजुवे तरीवरून आपल्याला होडीतून चांगला मोठा फेरफटका मारायचा असेल तर भातगावच्या पुलापर्यंत आपण या होडीतून जाऊ शकतो. कुठलाही गडबड गोंगाट नसलेल्या या ठिकाणी होडीतून केलेली भटकंती नक्कीच स्मरणीय होते.

तीन खाडय़ांच्या आणि चार तालुक्यांच्या संगमाचा हा करजुवे परिसर शांत-निवांत आहे. इथली शांतता, इथले सौंदर्य तसेच अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे याचे भान मात्र असायला हवे. हुल्लडबाजी, अचकट-विचकट आवाज, वाहनांचे कर्कश्श हॉर्न अशा थोर सवयी असणाऱ्यांनी इकडे फिरकू नये. येथे निसर्गाने भरभरून दिलेले आहे. त्याचा शांतपणे आस्वाद घेणे निसर्गाशी तादात्म्य पावणे, निसर्गाने केलेली विविध रंगांची उधळण उघड्या डोळ्यांनी भरभरून पाहणे आणि मन ताजेतवाने करणे हा येथे येण्याचा उद्देश असावा. तो सफल व्हावा आणि आपली भटकंती समृद्ध व्हावी.

[email protected]