
>> डॉ. कैलास दौंड
साहित्य संशोधनाच्या क्षेत्रात नव्याने येणाऱ्यांना तांत्रिक बाबींचे आणि आशयाच्या विश्लेषणासंबंधीचे मार्गदर्शन हवे असते. ‘पी.एचडी’ किंवा अन्य तत्सम पदवी मिळवू इच्छिणाऱ्यांना, तर विषय निवडीबाबतही मार्गदर्शनाची गरज पडते. मात्र हे मार्गदर्शन त्यांनी निवडलेल्या मार्गदर्शकांकडून मिळतेच असे नाही. अनेक संशोधकांची तर विषय निवडीबाबतही स्वःची काही भूमिका नसते. ही अडचण प्रा. डॉ. सुधाकर शेलार यांनी ‘साहित्य संशोधन : वाटा आणि वळणे’ हा मौलिक ग्रंथ लिहून दूर केली आहे.
प्रस्तुत लेखकाने या पुस्तकाची मांडणी सुटसुटीतपणे तर केलेली आहेच, त्याचबरोबर माहितीपर आणि तांत्रिक बाबींचा समावेश असूनही कुठेही बोजडपणा येऊ दिलेला नाही. या पुस्तकात एकूण पंधरा प्रकरणे असून त्यात ‘साहित्य संशोधन : स्वरूप व पद्धती’, ‘पदवीय शोधप्रबंधलेखन प्रक्रिया व पद्धती ’ , ‘ पदवीय संशोधनाची लेखनपद्धती : स्वरूप व दक्षता’, ‘वैचारिक साहित्याची समीक्षा व संशोधन काही दिशा’, ‘कवितेची समीक्षा आणि संशोधन : काही सूत्रे’, ‘चरित्र आत्मचरित्र : समीक्षा व संशोधन’ अशा विविध विषयांवर आधारीत प्रकरणांचा समावेश आहे. यावरून ग्रंथाची बहुउपयुक्तता लक्षात येते. वैचारिक साहित्यासोबतच ललित वाङ्मयातील कविता, चरित्र -आत्मचरित्र, कादंबरी, कथा, नाटक या साहित्य प्रकारातील साहित्यकृतीचे संशोधन वा समीक्षा यासंदर्भात प्रकरणवार केलेले नेमके भाष्य संशोधकांना नेमकी दृष्टी देणारे आणि संशोधनविषयक जाणिवा समृद्ध करणारे आहे.
प्रत्येक वाङ्मय प्रकाराचे मूल्यमापन करताना समीक्षा किंवा संशोधन करताना कोणकोणत्या बाबींचा का विचार करावा लागतो याची प्रा. डॉ. सुधाकर शेलार यांनी केलेली नेमकी मांडणी आकलन सुलभ झाली आहे. साहजिकच या पुस्तकाची उपयुक्तता केवळ संशोधक, समीक्षक यांच्यापुरती मर्यादित न राहता ती ललित लेखकांनाही सहाय्यभूत ठरणार आहे. कारण कविता, कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र या प्रकारातील साहित्यकृतीच्या समीक्षेत आणि संशोधनात कोणकोणत्या बाबींचा आणि तो कसा विचार केला जातो? याची वस्तुनिष्ठ चर्चा सदर ग्रंथात असल्यामुळे जाणिवा अधिक समृद्ध होऊन नव साहित्यिकाला लेखन करताना त्याचा उपयोग होणार आहे.
निखळ वाचकांनाही हा ग्रंथ साहित्यकृतीचा आस्वाद कसा घ्यावा, साहित्यकृतीचा अन्वयार्थ कसा लावावा याकडेही अंगुलीनिर्देश करणारा आहे. त्यामुळे संशोधक, लेखक आणि वाचक या तीनही घटकांना उपयुक्त ठरणारा हा ग्रंथ आहे. वाचन, अभ्यास आणि चिंतन यांची आवश्यकता डॉ. शेलार यांच्या मांडणीतून सतत व्यक्त झाली आहे. वैचारिक साहित्याची समीक्षासंदर्भात ते वैचारिक लेखनाच्या समीक्षकाने चिकित्सा करावयाची असते, त्या विचारांशी अभ्यासार्थ निवडलेल्या विचारवंताचे विचार सुसंगत आहेत की तो वेगळेच काही सांगू पाहतोय? या बाबीसंदर्भात भाष्य करण्यासाठी अभ्यासकाने अगोदर समकालीन विचारवंत वाचलेले असणे आवश्यक आहे असे ते नोंदवतात.
मध्ययुगीन वाङ्मयाचे संशोधन, लोकसाहित्याचे संशोधन स्वरूप, आंतरविद्याक्षेत्रीय सहसंबंध आणि संशोधन या बाबतीतल्या संशोधनासाठी उपयुक्त आणि दिशादर्शक ठरणारे मूलभूत स्वरूपाचे आणि आकलनसुलभ विवेचन त्यांनी वेगवेगळ्या प्रकरणांतून स्वतंत्रपणे केलेले आहे. ग्रंथाच्या अखेरीस तीन परिशिष्टे जोडलेली आहेत. मराठी भाषेतील साहित्य संशोधनाच्या वाटा रुंदावणारा हा ग्रंथ लेखनामागे लेखकाचा प्रदीर्घ अनुभव व तळमळ स्पष्ट दिसते. प्राध्यापक, लेखक, संशोधक यांच्यासह वाचकानींही अभ्यासावे असे हे बहुआयामी आणि बहुउपयोगी पुस्तक आहे.
साहित्य संशोधन : वाटा आणि वळणे
लेखक : प्रा. डॉ. सुधाकर शेलार
प्रकाशक : अक्षरवाङ्मय प्रकाशन, पुणे
पृष्ठ : 208, मूल्य : रुपये 180/-





























































