
>> डॉ. अविनाश भोंडवे
गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या लॉक डाऊनमुळे बंद असलेल्या शाळा-कॉलेजेसना पुन्हा सुरू करण्याबत समाजातील विविध स्तरातून मागण्या होत आहेत. राजकीय पक्षांकडून मुलांचे शैक्षणिक नुकसान होते आहे या सबबीवरही जोर दिला जात आहे. परंतु कोरोना प्रतिबंधक लस न देता मुलांना शाळेत पाठवायचे तरी कसे? या विचाराने पालक संभ्रमित झालेले आहेत. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात शाळा सुरू झाल्या तरी अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला. आता लसीकरण सुरू झाल्यावर हे पालक काहीसे निःशंक होतील आणि मुलांना शाळेत पाठवू शकतील.
हिंदुस्थानातील कोरोना पर्वाच्या दृष्टीने 12 ऑक्टोबर हा दिवस उल्लेखनीय ठरला. कोरोना विषाणू आणि कोरोना प्रतिबंधक लसीबाबतच्या ‘विषय तज्ञ समितीने’ (सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटी- एसईसी) भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी मान्यता दिली आहे. गेले पाच-सहा महिने हैदराबादस्थित भारत बायोटेक या कंपनीतर्फे या वयोगटातील लहान मुलांवर आणि किशोरांवर या लसीच्या चाचण्या होत होत्या. 18 वर्षांपेक्षा लहान वयाच्या मुलांवर कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सप्टेंबरमध्ये पूर्ण करून या महिन्याच्या सुरुवातीला त्यांचे अहवाल ड्रग्स अॅण्ड कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) यांना सादर केले होते.
केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (सीडीएससीओ) आणि तज्ञ समितीने या अहवालाचे कसून पुनरावलोकन केले. कंपनीने ज्या सकारात्मक शिफारसी दिल्या त्याबाबत सविस्तर विचारविनिमय केल्यानंतर हा अहवाल पूर्ण समाधानकारक वाटल्याने समितीने आपत्कालीन परिस्थितीत प्रतिबंधित वापरासाठी 2 ते 18 वर्षे वयोगटातील लसीच्या सार्वत्रिक वापरासाठी परवानगी देण्याची शिफारस केली आहे. ‘आपत्कालीन वापरासाठी’ ही मान्यता दिलेली आहे.
लहान मुलांसाठी तयार केलेली ही कोव्हॅक्सिन लस 2 ते 18 वर्षे वयोगटासाठी जगभरात मंजूर झालेली पहिली लस आहे. संपूर्णपणे हिंदुस्थानी बनावटीची ही लस दोन डोसमध्ये दिली जाणार असून पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये 20 दिवसांचे अंतर ठेवले जाणार आहे.
प्रत्यक्ष वापरासाठी पुढील टप्पे
या लसीला मंजुरी मिळाली. या बातमीनंतर अनेकांना आता ही लस आठवडाभरात मिळणार असे वाटू लागले, पण या मंजुरीनंतर ही लस लगेच मुलांना द्यायला सुरुवात होणार नाही. त्यासाठी काही विशेष महत्त्वाच्या गोष्टी या कंपनीला पूर्ण कराव्या लागतील. ही लस मुलांसाठी पूर्ण सुरक्षित असावी याकरिता या गोष्टींची पूर्तता करणे नितांत आवशयक आहे.
– भारत बायोटेकला ‘केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थे’कडून (सीडीएससीओ) पुढील नियामक मंजुरी घ्यावी लागेल. त्यानंतरच सदर लसीचे उत्पादन आणि बाजारपेठेतील विक्री सुरू करता येईल.
लसीचा आपत्कालीन वापर या अटी पूर्ण केल्यानंतरच केला जाऊ शकतो.
– या लसीमध्ये वापरलेला मृत कोरोना विषाणू हा पूर्णपणे निष्क्रिय आहे हे सिध्द करणारे संशोधन लसीच्या आंतरराष्ट्रीय नियमावलीनुसार (क्लिनिकल ट्रायल प्रोटोकॉल) सतत चालू ठेवावे लागेल.
– ही लस वापरणाऱ्या डॉक्टरांसाठी अद्ययावत माहिती, लसीसमवेत दिले जाणारे माहिती पत्रक (पॅकेज इन्सर्ट), उत्पादन वैशिष्ट्यांचा सारांश आणि तथ्यपत्रक कंपनीला तातडीने तयार करून ते मंजूर करून घ्यावे लागेल.
– ही लस टोचल्यानंतर होणाऱ्या दुष्परिणामांची यादी (अॅडव्हर्स इव्हेंट फॉलोइंग इम्युनायझेशन) आणि विशेष प्रकारचे दुष्परिणाम (अॅडव्हर्स इव्हेंट्स ऑफ स्पेशल इंटरेस्ट) याबाबतच्या माहितीचा सविस्तर अहवाल सादर करावा लागेल.
– योग्य विश्लेषणासह पहिल्या दोन महिन्यांमध्ये दर 15 दिवसांनी आणि त्यानंतर दर महिन्याला ‘नवीन औषधांच्या वैद्यकीय चाचण्यांबाबतच्या नियम 2019’ अनुसार अहवाल दाखल करावा लागेल.
या प्रक्रिया होण्यास किमान एक ते दीड महिना लागू शकेल. त्यानंतरच ही लस मुक्त स्वरूपात या वयोगटातील मुले-मुली आणि किशोर-किशोरींना देता येऊ शकेल.
या लसीचे महत्व
भारत बायोटेकच्या या लसीचे महत्त्व हिंदुस्थानी नागरिकांच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे. 16 जानेवारी 2021 पासून हिंदुस्थानात कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम सुरू झाली. आजवर एक अब्ज नागरिकांचे लसीकरण झाले आहे. पण या मोहिमेत फक्त 18 वर्षांवरील व्यक्तींचा समावेश होता. 18 वर्षांखालील बालके, लहान मुले आणि किशोरांसाठी आजवर लस नव्हती.
गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या शाळा-कॉलेजेसना पुन्हा सुरू करण्याबत समाजातील विविध स्तरांतून मागण्या होत आहेत. राजकीय पक्षांकडून मुलांचे शैक्षणिक नुकसान होते आहे या सबबीवरही जोर दिला जात आहे. परंतु कोरोना प्रतिबंधक लस न देता मुलांना शाळेत पाठवायचे तरी कसे? या विचाराने पालक संभ्रमित झालेले आहेत. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात शाळा सुरू झाल्या तरी अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला. आता लसीकरण सुरू झाल्यावर हे पालक काहीसे निःशंक होतील आणि मुलांना शाळेत पाठवू शकतील.
लहान मुलांना सुरक्षित आणि परिणामकारक लस आज उपलब्ध झाल्यामुळे पालक आपल्या लहान मुलांना लस देण्यात हिरिरीने पुढे येतील आणि त्यामुळे हिंदुस्थानातील कोरोनाची महासाथ लवकरच आटोक्यात येऊ शकेल. आज जगभरातील पुढारलेल्या राष्ट्रात 5 ते 17 वयोगटासाठी लसीकरण सुरू झालेले आहे. मात्र हिंदुस्थानात विकसित झालेली आणि हिंदुस्थानातच बनवली गेलेली कोव्हॅक्सिन ही लस 2 वर्षे ते 5 वर्षांच्या मुलांसाठी वापरली जाणारी जगातील पहिली लस ठरली आहे. आपणा सर्वांच्या दृष्टीने ही एक अभिमानाची बाब ठरावी.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप कोव्हॅक्सिनला आणीबाणी वापराचे अधिकार दिलेले नाहीत. भारत बायोटेकने लसींच्या मान्यताप्रत जागतिक यादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे प्रस्तुत केली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने येत्या सहा आठवड्यांत ही जागतिक मान्यता दिली जाईल असे सांगितलेले आहे.
ऑगस्टमध्ये हिंदुस्थानने 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी झायकॉव्ह-डी या आणखी एका संपूर्ण हिंदुस्थानी बनावटीच्या कोरोना प्रतिबंधक लसीला आणीबाणी वापराची मंजुरी दिलेली आहे. डीएनए पद्धतीची ही लसदेखील जगातील या प्रकारची पहिली लस आहे आणि ती इंजेक्शनने न टोचता एका विशेष उपकरणामार्फत देता येते, मात्र ही लस 3 डोसमध्ये घ्यावी लागते आणि ती घेण्यासाठी लागणाऱ्या विशेष उपकरणामुळे या लसीची किमत जास्त होईल, असे अनेक तज्ञांचे मत आहे.
एकंदरीत कोरोनाला नेस्तनाबूत करण्यासाठी आता सर्व वयाच्या व्यक्तींसाठी लस उपलब्ध होणार आहे. साहजिकच कोरोनाच्या साथीचा अंत आता नजीक आलाय.
कोरोनाची दुसरी लाट संपल्यावर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येईल आणि तिच्यात लहान मुले मोठ्या प्रमाणात बाधित होतील असे अनुमान केंद्रीय आणि राज्य सरकारकडून अनेकदा जाहीर केले गेले होते. त्यामुळे काहीशा भयभीत असलेल्या पालकांना आणि किशोरांनादेखील या परवानगीमुळे हायसे वाटेल.
कोरोनाची लहान मुलांसाठी बनवलेल्या या कोव्हॅक्सिन लसीचा परिणाम म्हणून या मुलांमध्ये 85 टक्के अँटिबॉडीज निर्माण होत आहेत, असे या चाचण्यांच्या अहवालावरून समजते. त्यामुळे ही लस या वयोगटातील मुलांचे कोरोनापासून उत्तम संरक्षण करेल यात शंकाच नाही. अजपावेतोच्या अहवालानुसार या लसीमुळे चाचणीदरम्यान कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत. दंड दुखणे, ताप येणे, काहीसे गळून गेल्यासारखे वाटणे एवढेच विपरीत परिणाम या मुलांमध्ये आढळले. साहजिकच ही लस मुलांसाठी सुरक्षित आहे आणि यापुढील अधिक चाचण्यांतही ही गोष्ट अधोरेखित होईल यात शंकाच नाही.
(लेखक आयएमएचे अध्यक्ष आहेत.)
[email protected]




























































