
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि फ्लेचर पटेलशी संबंध काय आहे? तीन केसेसमध्ये फ्लेचर पटेल पंच कसे? फॅमिली फ्रेंडला पंच म्हणून घेण्यामागचा वानखेडेंचा हेतू काय, अशा प्रश्नांची सरबत्ती आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली.
एनसीबीच्या कारवाईच्या संदर्भात नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले. फ्लेचर पटेल हा समीर वानखेडे यांचा फॅमिली फ्रेंड आहे. तो समीर वानखेडेंच्या पब्लिसिटीसाठी कार्यक्रम आयोजित करत असतो. त्यांचे फोटोही मी ट्विटरवर टाकले आहेत. साधारणपणे एखादा गुन्हा घडतो तेव्हा आजूबाजूच्या लोकांना बोलावून पंचनामा केला जातो. माझ्याकडे पंचनाम्याचे फोटो आहेत. फ्लेचर पटेलने कोणते कार्यक्रम आयोजित केले ते फोटो ट्विटरवर टाकले आहेत. माय सिस्टर लेडी डॉन त्यांचेही फोटो टाकले आहेत, असेही नवाब मलिक म्हणाले.
आपण गेल्या वर्षभरातील एनसीबीच्या केसेसची माहिती घेतली. त्यात तीन केसेसची माहिती संदिग्ध वाटली. या तीनही केसमध्ये फ्लेचर पटेल पंच आहेत. फ्लेचर पटेल इंडिपेंडंट पंच आहेत असे सांगता, मग ते तुमचे फॅमिली फ्रेंड कसे, पंचनाम्यासाठी जवळच्या लोकांना घेता. याचा अर्थ ही कारवाई ठरवून केलीय का, असा सवालही नवाब मलिक यांनी केला.
या सर्व प्रकरणाशी लेडी डॉनचा काय संबंध आहे? ही लेडी डॉन कोण आहे? हे कुठले रॅकेट मुंबईत सुरू आहे? फ्लेचर पटेल लेडी डॉनच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये दहशत निर्माण करतोय. हे सगळे लोक बॉलीवूडमध्ये दहशत निर्माण करून खंडणी उकळण्याचे काम करत आहेत का, असा सवालही नवाब मलिक यांनी केला. ही लेडी डॉन एका पक्षाच्या चित्रपट सेनेची कार्यकर्ती आहे. ही लेडी डॉन एका पक्षाच्या चित्रपट सेनेची पदाधिकारी असल्याची माहितीही त्यांनी दिली.
एकच पंच अनेक ठिकाणी
सीआरपीसी कायद्यात एकच पंच ठिकठिकाणी दिसत असेल तर केसेसमध्ये तथ्य नाही असा निष्कर्ष बऱयाच केसेसमध्ये कोर्टाने काढला आहे याची आठवणही नवाब मलिक यांनी करून दिली आहे.


























































