
दिवाळी अंक हे महाराष्ट्राचे वैशिष्टय़, सांस्कृतिक संचित आणि परंपरा. ही अंक संस्कृती जपण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जातात. याचाच भाग म्हणून ग्रंथालीने दिवाळी अंकासोबत वाचकांना डिजिटल दिवाळी पहाट अनुभवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
ग्रंथालीने दिवाळी अंकांच्या संचाची योजना आखली आहे. यामध्ये मौज, माझा दिवाळी अंक, ऋतुरंग, पद्मगंधा, अक्षरधारा आणि शब्दरुची हे सहा दर्जेदार दिवाळी अंक असतील. या सहा अंकांचा एकूण 1450 रुपयांचा संच वाचकांना 1100 रुपयांत देण्यात येईल. त्यासोबत दिवाळीनिमित्त दोन अविस्मरणीय दिवाळी पहाट डिजिटल माध्यमातून अनुभवता येतील. संच घेणाऱयास आठवणींचा ‘बकुळगंध’ हा दिवाळी पहाट कार्यक्रम पाहता येणार आहे. ज्यात आपल्या चार आप्तेष्टांना दिवाळी भेट म्हणून सहभागी करून घेता येईल. शिवाय संच घेणाऱयास बोनस म्हणून ‘भीमण्णा’ ही पंडित भीमसेन जोशी यांना समर्पित दिवाळी पहाट पाहता येईल.
‘ऍड फिझ’ आणि अक्षरधारा बुक गॅलरी व ज्योती स्टोअर्स यांच्या सहयोगाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
जन्मशताब्दीनिमित्त स्वरांजली
- ‘भीमण्णा’ ही प्लॅनेट मराठीची निर्मिती असून ती पंडित भीमसेन जोशी यांना वाहिलेली संगीतमय आदरांजली आहे.
- आठवणींचा बकुळगंध- कवयित्री शांता शेळके यांच्यासह कवी वसंत बापट, लोककवी वामनदादा कर्डक आणि पंडित भीमसेन जोशी यांच्या शब्द-सुरांनी सजलेली अपूर्व पहाट.






























































