
>> दिलीप जोशी
आजची रात्र कोजागरी पौर्णिमेची. पावसाळा संपल्यानंतरच्या स्वच्छ आकाशातून आज पूर्ण चंद्रमा लखलखत्या चंदेरी चांदण्याची बरसात करेल. चंद्राचा प्रकाश हा सूर्यप्रकाशाचाच परावर्तित प्रकाश, पण तो शीतल होऊन येणारा. त्या प्रकाशात रात्री ‘नेव्हिगेशन’ किंवा मार्गक्रमण करणाऱया दर्यावर्दींना आणि अरण्य पार करून चालत किंवा बैलगाडीने परगावी निघालेल्या प्रवाशांना मोठाच दिलासा मिळायचा. अशा शुभ्र चांदण्यांच्या अनेक पौर्णिमा अनुभवता आल्या. एका पौर्णिमेला आम्ही जगप्रसिद्ध ताजमहालच्या परिसरात होतो, तर कधी कन्याकुमारीला संध्याकाळी पश्चिम सागरात बुडणारा सूर्य आणि पूर्व सागरातून वर येणारा पूर्णचंद्र यांचं दुर्लभ दर्शन झालं होतं. अबू पहाडवरची पौर्णिमा होळीची होती. संगमरवरी दिलवाडा मंदिरं चांदण्यात पाहताना ती शीतलता मनातही झिरपत होती. तशाच आमच्या निसर्गरम्य अशा भरमुंबईतल्या कित्येक कोजागरी पौर्णिमा सुखावणाऱया होत्या.
प्राचीन कथेनुसार ‘‘को-जागर्ति?’’ म्हणजे ‘‘कोण जागं आहे?’’ असं प्रश्न विचारत त्या रात्री देवता प्रश्न करतात. त्यातला पारंपरिक कथाभाग वगळला तरी एकूणच ‘जागृती’बाबतची संकल्पनाच रम्य आहे. सावध करणारी, विचार करायला लावणारी आहे. बदलत्या काळानुसार जागेपणाच्या व्याख्याही बदलत जातात. माणूस झोपेत स्वप्नं पाहतो, परंतु जागेपणी स्वप्नं पाहिली तर ती प्रत्यक्षात उतरवण्याचा ध्यास निर्माण करते ती जागरूकता. ते खरं जागेपण; अन्यथा रोजची निद्रा आणि सकाळची जाग हा तर जीवनक्रमच असतो. विश्रांतीसाठी झोप आवश्यक असतेच. त्यातून जागृती प्राप्त झाल्यावर ऊर्जा प्राप्त होऊन काही चांगलं कार्य करावं ही अपेक्षा किंवा ध्यास ज्याने त्याने आपापल्या कुवतीनुसार मनात बाणवला पाहिजे.
त्याच आशयाने स्वामी विवेकानंद म्हणाले ‘‘उत्तिष्ठ, जागृत! उठा, जागे व्हा!’’ हे जागेपण मनाचं. जागृतावस्थेतही आपण अनेक बाबतीत सुप्तावस्थेतच असतो. ज्ञान, विज्ञान आणि सततचा अभ्यास यातून हळूहळू जागेपण येतं. तमसो मा ज्योतिर्गमय… हा अंधार अज्ञानाचा आणि आकाश ज्ञानाचा म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, ‘‘अत्तदीप भव! तुम्हीच दीप व्हा!’’ ‘‘स्वतःच दिवा झालं की, तो अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे’’ असं संत सोहिरोबा म्हणतात आणि संत नामदेव तर आत्मविश्वास व्यक्त करतात, ‘‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’’.
हा ज्ञानदीप अंतर्यामी उजळला ही जागृती. हे काही केवळ आध्यात्मिक गूढगुंजन नव्हे. आपल्या रोजच्या व्यावहारिक जीवनातही आपल्याला अव्याहत किंवा सतत जागरूक राहावंच लागतं. अहिरभैरव रागातली एक छान रचना आहे… ‘उठ जाग मुसाफिर भोर भयी, अब रैन कहां तू सोवत है, जो सोवत है सो खोवत है, जो जागत है सो पावत है’ म्हणजे ‘हे (जीवनाच्या) मुशाफिरा पहाट झाली आहे, जागा हो. कारण झोपेत राहणारा बरंच काही गमावतो आणि जागृत माणूस सारं काही मिळवतो.’
विविध क्षेत्रांतलं ज्ञान, सामाजिक भान, कौटुंबिक कर्तव्य अशा अनेक पातळय़ांवर आपण एकाच वेळी वावरत असतो. हा वावर अर्थपूर्ण (मीनिंगफुल) व्हायला हवा. तर मनाची सजगता, सभोवतालचं भान खूप महत्त्वाचं. त्यासाठी प्रश्न की, ‘‘कोण जागं आहे?’’
आता एक खरं की, झोपलेल्याला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही. कारण ते सोंग हीच त्याची मतलबी ‘जागरूकता’ असते, परंतु त्यात मानसिक ताणतणाव आहेत आणि सोंग फार काळ टिकत नाही. मुखवटे कधी ना कधी गळून पडतात. त्यापेक्षा चेहराच पारदर्शी आणि प्रसन्न ठेवता आला तर? मनाच्या खऱया जागृतीनंतर ते आपोआप घडतं. त्यासाठी जिद्द हवी, अभ्यास हवा. उगाच काहीही ठाऊक नसताना वितंडवादात गुरफटण्यापेक्षा सुज्ञपणाच्या मार्गाचा शोध हवा आणि हे सारं ‘आपणच आपल्याला’ शिकवायचं असतं. जागेपण ते हेच. अशी जागृती नव्या पिढीत व्यापक प्रमाणावर निर्माण झाली तर विकारांवर अंकुश ठेवून जग विचारी होईल आणि त्यातून कौटुंबिक, सामाजिक आणि जागतिक प्रश्नही कदाचित सुटायला मदत होईल, पण ‘पडेल असं सुज्ञतेचं चांदणं? होई जग जागं?’ चांगला विचार करायला काय हरकत आहे. कारण ‘सारंच कोसळतंय’ असं वाटत असताना खूप माणसं, खूप काही मंडळी चांगलं काम करत आहेत, खऱया अर्थाने जागृत आहेत हे चित्र दिलासादायक, स्फूर्तिदायक आहेच.






















































