1 लिटर पेट्रोल = कोथिंबीर, भाज्यांच्या दरात भरमसाठ वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडरनंतर आता भाज्यांचे भावही गगनाला भिडले आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये टोमॅटोचे भाव 90 रुपये झाले आहेत. तर राज्यात कोथिंबीरचे भाव काही ठिकाणी 100 ते थेट 250 रुपये झाल्याचे दिसून येत आहे. पेट्रोल-डिझेलसोबत खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव वाढल्याने सामान्य नागरिक खूप त्रस्त झाले आहेत.

एक लिटर डिझलच्या किमती इतकेच झाले टोमॅटोचे भाव

अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान आणि बाजारात येण्यास झालेल्या विलंबामुळे टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिन्यापूर्वी प्रतवारीनुसार 10 ते 20 रुपये किलोने विक्री झालेला टोमॅटो पुणे, मुंबई, ठाणे परिसरात 45 ते 50 रुपये किलोने विकला जात आहे. कलकत्त्यात टोमॅटोची किंमत थेट 93 रुपये इतकी झाली आहे.

कोथिंबीर 250 ते 300 रुपये किलो

परतीच्या पावसामुळे शेतातील कोथिंबीर उभे पीक खराब झाल्याने महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात कोथिंबीरच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. राज्यात काही ठिकाणी कोथिबिरचे दर 100 ते 120 रुपये झाले असून नागपूरमध्ये हेच दर थेट 250 ते 300 रुपयांवर पोहोचले आहेत. नागपूरच्या कॉटन मार्केटमध्ये कोथिंबीर 250 ते 300 रुपये किलोचा दराने विकली जात आहे.