
संरक्षक दलांनी जम्मू-कश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात दहशतवादविरोधी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत दहशतवाद्यांच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान, अशी माहितीही मिळाली आहे की दहशतवादी सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी ग्रेनेड हल्ले करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्या दृष्टीने सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लश्कर-ए-तोयबा चे दोन दहशतवादी गट ज्यामध्ये आठ दहशतवादी आहेत. यामध्ये एक गाइडही असल्याची माहिती मिळते. हे सारे दहशतवादी सध्या पाकिस्तान व्याप्त कश्मीरमध्ये ट्रेनिंग घेत असून पुंछ जिल्ह्यात शिरण्याच्या प्रयत्नात आहे. या भागात ते मोठमोठ्या कारवाया करण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती मिळत आहे. गेल्या आठवड्यात जवानांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधातील शोध मोहीम गेल्या 9 दिवसांपासून सुरू आहे.
पुंछमध्ये 5 दहशतवादी घुसल्याची माहिती सुरक्षादलांना मिळाली असून गुप्तचर यंत्रणांनी अॅलर्ट दिला आहे. 15 ऑक्टोबरपासून संपूर्ण यंत्रणा अॅलर्टवर आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवाद विरोधी कारवायांमुळे बिथरलेल्या दहशतवाद्यांनी आता सामान्य जनतेला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये विशेष करून जम्मू-कश्मीरच्या बाहेरील राज्यातून येणाऱ्या नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. रविवारी बिहारच्या दोन मजुरांची इथे हत्या करण्यात आली. कश्मीर खोऱ्यात अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत या महिन्यात 11 जणांवर हल्ला करून त्यांना मारण्यात आले आहे. या पार्श्वभूमिवर अनेकांनी जम्मू-कश्मीरमधून पलायन करण्यास सुरुवात केली आहे.
हिंदुस्थानचे लष्कर प्रमुख एम एम नरवणे यांनी आज जम्मू येथे सीमाभागाचा दौरा केला.




























































