चला कॉलेजला! आजपासून कॅम्पस गजबजणार, कोरोना नियमावलीचे पालन करून वर्ग भरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे गेले दीड वर्ष बंद असलेली महाविद्यालये आजपासून पुन्हा सुरू होत आहेत. कोरोना नियंत्रणात आल्याने महाविद्यालये उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व महाविद्यालयांनी त्या पार्श्वभूमीवर वर्गांचे निर्जंतुकीकरण केले. सोशल डिस्टन्सिंग पाळता यावे म्हणून तशी आसनव्यवस्थाही करण्यात आली आहे.

मुंबईतील महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठीही जय्यत तयारी केली आहे. सिडनहॅम, सेंट झेवियर्स आदी महाविद्यालयांकडून मुख्य प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबाचे फूल देऊन करण्यात येणार आहे. त्यावेळी शिक्षण मंत्रालयाचे अधिकारीही आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना लॉकडाऊनमुळे महाविद्यालये बंद करण्यात आली. विद्यार्थ्यांची शिकवणी तेव्हापासून ऑनलाइनच सुरू आहे. उद्यापासून विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात बसून शिकणार आहेत. संभाव्य संसर्ग आणि गर्दी टाळण्यासाठी अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना दोन शिफ्टमध्ये बोलवण्याचेही वेळापत्रक बनवले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रवेशद्वारावरच थर्मल चेकिंग करून आत प्रवेश दिला जाणार आहे.

महाविद्यालयांना स्वच्छतेचेही काटेकोर पालन करावे लागणार आहे. स्वच्छतागृहांचा वापर कसा करावा याबद्दल नियम बनवले गेले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क घालणे अनिवार्य आहे तसेच स्वतःची पाण्याची बाटली सोबत आणावी लागणार आहे. वर्गामध्ये इतर कुणाच्याही वस्तू अगदी पेनसुद्धा वापरता येणार नाही अशा सूचना देण्यात आल्या आहेत.