
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना राजकीय शॉक देणाऱयाला सोन्याचा मुकुट घालण्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीची समीकरणे बदलत आहेत. चंद्रकांत पाटील यांनाच शह देण्याची तयारी सुरू झाल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी करण्याबाबत काँग्रेस, शिवसेनेशी चर्चा सुरू असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 21 जागांसाठी 21 नोव्हेंबरला मतदान होणार असून, सध्या अर्ज भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे. 22 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत यापूर्वी सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन पॅनल करून निवडणुकीत उतरत. मात्र, यंदा भाजपला वगळण्याचा निर्णय राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी घेतला आहे. केन ऍग्रो कारखान्याच्या प्रकरणातून भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी स्वबळाचा नारा दिल्याने बँकेतील राजकीय समीकरणे बदलण्याच्या मार्गावर होती. त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर ही समीकरणे आता पूर्णपणे बदललेली आहेत. राष्ट्रवादीने काँग्रेस व शिवसेनेशी केलेली प्राथमिक चर्चा यशस्वी झाली आहे. त्यात बहुतांश जागांबाबत तिन्ही पक्षांचे एकमत होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपपेक्षा महाविकास आघाडीचा हात महत्त्वाचा मानल्याने तिन्ही पक्षांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या दोन दिवसांत जागावाटप निश्चित होण्याची शक्यता आहे.
सांगली जिल्हा बँकेच्या संचालक पदावर गेल्या अनेक वर्षांपासून हेवीवेट नेत्यांचा राबता आहे. यंदाच्या निवडणुकीतही खासदार, आमदार, माजी आमदार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशा वजनदार राजकारण्यांचीच उमेदवार म्हणून गर्दी असणार आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत यापूर्वी सर्वपक्षीय राजकारणी एकत्रितपणे नांदण्याची परंपरा होती. तालुका स्तरावरील स्वतःचे उद्योग, संस्था यांना पाठबळ मिळावे म्हणून अनेक जण या बँकेत येत असतात. चांगल्या परंपरेप्रमाणे घोटाळ्यांची परंपराही या बँकेला लाभली आहे. प्रशासक नियुक्तीची नामुष्कीही यापूर्वी या बँकेवर ओढावली होती. त्यातून गेल्या पाच वर्षांत संचालक मंडळाने बँकेला आर्थिक सक्षमतेत राज्यात पुढे नेले.
भाजपातील वाद विकोपाला
भाजपने स्वबळाचा नारा दिला असला, तरी भाजपातील वाद विकोपाला गेले आहेत. खासदार संजय काका पाटील व पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यात सध्या विस्तवही जात नाही. त्यामुळे हे दोन्ही नेते स्वबळाच्या नावावर एकत्र कसे येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
थकीत कर्जप्रकरणावरून चिखलफेक
निवडणूक जवळ येताच थकीत कर्ज प्रकरणावरून चिखलफेक सुरू झाली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष असणारे पृथ्वीराज देशमुख यांच्या केन ऍग्रो कारखान्याच्या थकीत कर्ज प्रकरणाचा मुद्दा भाजपचे खासदार आणि बँकेचे संचालक संजय पाटील, आणि राष्ट्रवादीचे आमदार व संचालक मानसिंग नाईक यांनी जोरदारपणे लावून धरला आहे. अशा काही थकीत कर्ज प्रकरणांची चर्चाही रंगली आहे. त्यामुळे होणारी निवडणूक चांगलीच रंगणार, अशी चिन्हे दिसत आहेत.


























































