
अॅण्टाप हिलच्या सीजीएस काँलनीत आज दुपारी दुर्देवी घटना घडली. डागडुजीच्या कामानिमित्त मैदानात खोदलल्या खड्डय़ातील पाण्यात बुडाल्याने दोघा मुलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी अॅण्टॉप हिल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
यशकुमार चंद्रवंशी (11) आणि शिवम जयस्वाल (9) अशी त्या मुलांची नावं आहेत. अॅण्टॉप हिल सीजीएस कॉलनीतल्या सेक्टर 7 मधील इमारत क्रमांक 43 च्या मागे मैदान आहे. त्या मैदानात डागडुजीच्या कामासाठी खड्डे खोदण्यात आले आहेत. त्या खड्डय़ात पाणी साचले होते. आज दुपारी चारच्या सुमारास यशकुमार आणि शिवम तेथे अन्य मुलांसोबत खेळत होते. खेळत असताना दोघे खड्डय़ातल्या पाण्यात पडले आणि पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. हा प्रकार लक्षात येताच मैदानात खेळणारी मुले व तेथे उपस्थित नागरिकांनी दोघांना पाण्यातून बाहेर काढले. त्यांना लगेच शीव रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून यशकुमार आणि शिवमला मृत घोषित केले. दोघेही त्याच परिसरात राहत होते. मैदानात खोदून ठेवलेल्या खड्डय़ात पाणी साचले तरी त्याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. अॅण्टॉप हिल पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.






























































