भुयारी गटारनंतर आता गॅसवाहिनीसाठी नगरमधील रस्ते खोदणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भुयारी गटार योजनेच्या कामासाठी नगर शहरातील रस्त्यांची खोदाई झाल्यानंतर आता गॅसवाहिनीच्या कामासाठी पुन्हा रस्त्यांची खोदाई होणार आहे. भारत गॅस रिसोर्सेसने यासाठी मनपाकडे परवानगी मागितली असून, पहिल्या टप्प्यातील 52 किलोमीटरच्या खोदाईच्या कामासाठी 7.85 कोटींचे शुल्क भरण्याचे निर्देश मनपाने या कंपनीला दिले आहेत. सावेडी उपनगरातील प्रभाग 1 व 2 मधून या कामाला सुरुवात होणार आहे.

मुंबई, पुण्यासारख्या मोठय़ा शहरांमध्ये राबविण्यात आलेला पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा करण्याचा प्रकल्प आता नगर शहरातही राबविला जाणार आहे. भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेडमार्फत हा प्रकल्प होत असून, कंपनीच्या प्रतिनिधींमार्फत नगर शहरात गॅसधारकांच्या नोंदणीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. यासाठी शहरात शेकडो किलोमीटरची गॅसवाहिनी टाकली जाणार आहे. प्रभागनिहाय पाइपलाइनची लांबी, सध्याचे घरगुती व व्यावसायिक ग्राहक आदींचे सर्वेक्षणही कंपनीकडून करण्यात आले आहे. यात 48 हजार 708 घरगुती व 1146 व्यावसायिक आणि 179 हॉटेल्सचा समावेश आहे. पाइपलाइनसाठी रस्ता खोदाई करण्यासाठी कंपनीने महापालिकेकडे अधिकृत प्रस्ताव सादर केला होता.

पहिल्या टप्प्यात चार ते पाच प्रभागांमध्ये खोदाईसाठी परवानगी मागण्यात आली होती. यात 112 किमीच्या पाइपलाइनचा प्रस्ताव होता. मात्र, कंपनीकडून नव्याने सर्वेक्षण होऊन 52 किमीच्या खोदाईचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यासाठी मनपाने 7 कोटी 85 लाख रुपयांचे खोदाई शुल्क भरण्यासाठी सोमवारी कंपनीला पत्र दिले आहे; तसेच 39 लाख रुपयांची अनामत रक्कम भरण्याच्याही सूचना दिल्या आहेत.

सावेडी उपनगरातून खोदाईचे काम सुरू होणार आहे. सुरुवातीला प्रभाग 1 व 2 मध्ये खोदाई होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व प्रभागांमध्ये गॅसवाहिनी टाकण्यात येणार आहे.

खोदाई शुल्कातून रस्ते दुरुस्त करा!

मनपाकडे प्राप्त होणाऱया खोदाई शुल्कातून ज्या ठिकाणी खोदाई करण्यात आली आहे, तेथील रस्त्यांचीच तत्काळ दुरुस्ती करावी. इतर कामांसाठी हा पैसा वापरू नये, अशी मागणी नगरसेवक सागर बोरुडे यांनी स्थायी समितीच्या सभेत केली. या संदर्भात नियोजनाचा प्रस्ताव महासभेकडे पाठविण्यात येणार असल्याचे शहर अभियंता सुरेश इथापे यांनी यावेळी स्पष्ट केले.