मी मराठी, मला न्याय द्या! क्रांती रेडकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्यन खान प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे वादाच्या भोवऱयात सापडले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांवरही गंभीर आरोप होत आहेत. समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने सर्व आरोप जाहीररीत्या फेटाळले आहेत. क्रांतीने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र लिहिले आहे. ‘मी मराठी आहे. एक मराठी मुलगी म्हणून मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय. मला न्याय द्या,’ अशी कळकळीची साद तिने उद्धव ठाकरे यांना घातली आहे.

क्रांती रेडकर हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहिणीच्या नात्याने हे पत्र लिहिले आहे. ‘मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊनच मी वाढले. कुणावर अन्याय करू नये आणि आपल्यावर होणारा अन्याय मुळीच सहन करू नये हे त्या दोघांनी शिकवले. तोच धडा गिरवत मी माझ्या खासगी जीवनावर हल्ला करणाऱया उपद्रवी लोकांविरुद्ध ठामपणे उभी आहे.’ असे क्रांतीने म्हटले आहे.

तुम्ही अन्याय होऊ देणार नाही… मला खात्री आहे!

शिवसेनाप्रमुखांचा आवर्जून उल्लेख करताना क्रांती लिहिते, ‘एका महिलेवर आणि तिच्या कुटुंबावर होणारे खासगी हल्ले हे राजकारणाचे नीच स्वरूप आहे. आज शिवसेनाप्रमुख नाहीत, पण तुम्ही आहात. त्यांची सावली, त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो. तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही,’ असा विश्वासही क्रांती रेडकर हिने व्यक्त केला.

मी एकटी लढतेय…लोक फक्त मजा बघताहेत!

‘मी एकटी लढतेय आणि सोशल मीडिया व त्यावरचे लोक फक्त मजा बघताहेत,’ अशी खंतही क्रांतीने पत्रात व्यक्त केली आहे. आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रूची लक्तरे चारचौघांत उधळली जात आहेत. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला आहे. विनोद करून ठेवला आहे, अशा भावनाही क्रांती रेडकर हिने व्यक्त केल्या आहेत.