
एसटी कर्मचाऱयांना राज्य शासनाप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता देण्याचे आश्वासन सरकारने दिल्यानंतर कामगार कृती समितीने गुरुवारी रात्रीपासून आंदोलन मागे घेण्याचे आश्वासन दिले. तरीही राज्यातील काही आगारांत काही कर्मचारी काम बंद पाडण्याचे प्रयत्न करीत असल्याने महामंडळाने अशा कर्मचाऱयांवर ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
राज्य शासनाप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता देणे, घरभाडे भत्ता देणे यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कामगारांनी बुधवारपासून उपोषण सुरू केले होते. परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांच्यासोबत गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीत राज्य शासनाप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता, (एचआरए) घरभाडे भत्त्याच्या दर 8, 16 आणि 24 टक्केप्रमाणे वाढविण्याचे मान्य करण्यात आले. यावेळी संयुक्त कृती समितीने कामगारांची वार्षिक वेतनवाढ 2 टक्क्यांवरून 3 टक्के करण्याची मागणी केली. या वेतनवाढीबाबत आपण सकारात्मक असून याप्रकरणी दिवाळीनंतर बैठक घेण्याचे आश्वासन यावेळी परिवहनमंत्री अॅड. परब यांनी दिले. यानंतर कृती समितीने उपोषण आंदोलन गुरुवारी रात्रीपासून मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी पुन्हा कामगारांनी काही आगारांत जाऊन काम बंद पाडले. या सर्व कामगारांवर शिस्त मोडून महामंडळाचे नुकसान केल्याप्रकरणी कारवाई करण्याचा इशारा देणारे पत्रक महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी काढले आहे. या आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार आहे. यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर ‘मेस्मा’ अंतर्गत बडतर्फीची कारवाई होऊ शकते असे म्हटले जात आहे.
औद्योगिक न्यायालयाने संप बेकायदा ठरवला
एसटी कामगारांच्या संपाला औद्योगिक न्यायालयाने बेकायदेशीर ठरवले असून त्यांना कामावर परतण्याचे आदेश दिले आहेत. कामगारांच्या कृती समितीने महामंडळासोबत झालेल्या यशस्वी चर्चेनंतर आपले आंदोलन 28 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून मागे घेतले होते. तरीही काही आगारांमध्ये नियमबाह्य आंदोलन, संप सुरू असल्याने महामंडळाने औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने संपाला अंतरिम स्थगिती देत आंदोलने, संप, निदर्शने बेकायदेशीर ठरवले असून प्रतिबंधात्मक आदेश पारित केले आहेत. सदर आदेश एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचाऱयांना लागू असून औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व एसटी कर्मचाऱयांनी तातडीने आपल्या कामावर हजर व्हावे, असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.






























































