
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. या उद्यानातील विविध प्रकल्पांच्या उभारणीत उद्योजकांचे तसेच स्थानिकांचे सहकार्य घ्या. प्राधान्यक्रम निश्चित करून कामे वेळेत पूर्ण करा. प्राणी उद्यान पर्यटक, वन्यजीव प्रेमींसाठी हे उद्यान आकर्षणाचे केेद्र ठरावे असे प्रयत्न करा, असे निर्देशही त्यांनी दिले.
नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, या प्रकल्पासाठी उद्योजकांना आणि स्थानिकांना सोबत घेऊन नियोजन करा. उद्यानात आंतरराष्ट्रीय विविध प्राणी-पक्षी आणून स्थानिक ग्रामस्थांना रोजगार, उद्योग संधी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी पर्यटकांना आकर्षित करता येईल अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी वन विकास प्राधिकरणाने समन्वय साधावा. उद्योजक, स्थानिक व्यावसायिक आदींना सोबत घ्यावे. समृद्धी महामार्ग पूर्ण होत आहे. यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आफ्रिकन सफारी, नाईट सफारी असे विविध उपक्रम राबविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. या ठिकाणी आदिवासी ग्राम तयार करून आदिवासींच्या विकासासाठी त्यांनी उत्पादित केलेल्या मालासाठी बाजारपेठ निर्माण करावी. आदिवासी परंपरा आणि संस्पृती पर्यटकांना माहिती होण्यासाठी आदिवासी चित्रकला, नृत्य आदीचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ निर्माण करावे, त्यांना रोजगार उपलब्ध होईल असे उपक्रम राबविण्यात यावेत, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
बैठकीस राज्याचे मुख्य सचिव सीताराम पुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वन संरक्षक जी. साईप्रकाश, मुख्य वन संरक्षक सुनील लिमये आदी उपस्थित होते. बैठकीत सुरुवातीला प्राणी उद्यानाचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन यांनी सादरीकरण केले.



























































