
- दिलीप जोशी, [email protected]
आज धनत्रयोदशी… दिवाळीचा आरंभ झाला आहे. लक्षदीप उजळून साजरा करण्याचा असा दीपोत्सव जगात फक्त हिंदुस्थानातच होतो हे आपलं सांस्कृतिक वैशिष्टय़. आता जागतिकीकरणामुळे त्याचं लोण जगातही पसरतंय. अमेरिका आणि युरोपमध्येही दिवाळीची महती पोहोचली आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे, म्हणजेच निराशेकडून उत्साहाकडे जाण्याचा संदेश देणारा हा सण खरोखरच मनं उल्हासित करतो. श्रीमंत, गरीब सारेजण आपापल्या पद्धतीने दीपावली साजरी करत असतात. आयुष्यात आपली भरभराट होवो अशी प्रार्थना मनोमन करतात ‘सर्वे सुखिनः सन्तु’ हे साध्य झालं तर जगात समाधान नांदेल परंतु अनेकदा विपरीत परिस्थितीमुळे जगभरातील कित्येकांच्या जीवनात अंधार दूर करणारे प्रकाशकिरण येत नाहीत, ते यावेत आणि सर्वजण सुखी व्हावेत, अशी मनोकामना व्यक्त करूया. ‘ज्योत से ज्योत जगाते चलो’ हे लक्षात ठेवूया.
गेले सुमारे वीस महिने संपूर्ण मानव समाज कोविड महामारीने ग्रासला होता. 2020 ची सुरुवातच कोविडच्या संकटाने झाली. चीनमध्ये उद्भवलेला हा रोग, इटली आणि ब्राझील यांच्या फुटबॉलच्या सोहळय़ातील गर्दीने युरोपात फैलावला. बघता बघता कोविडने जग व्यापलं. प्रत्येकजण धास्तावला. त्यातून कोणाचीच सुटका नव्हती. इंग्लंडच्या राजमहालापासून ते गरीब देशातल्या झोपडवस्तींपर्यंत सर्वत्र कोविडने सारखंच थैमान घातलं. पहिली लाट, दुसरी लाट आणि तिसरी येतेय का याची भीती मनात बाळगत स्वतःची आणि इतरांचीही काळजी घेण्यासाठी काही कठोर नियम पाळणे हाच इलाज होता.
आपल्या देशात साधारण मार्च 2020 च्या सुरुवातीला कोविडची भीषणता दिसू लागली. त्यावेळी या अकल्पित महामारीवर लस नसल्याने ‘लॉक डाऊन’ हाच एकमेव उपाय उरला. मुखपट्टी, परस्परांपासून दूर राहावे यासाठी स्वच्छता या त्रिसूत्रीशिवाय गत्यंतर नव्हतं. सगळा सळसळता जीवनप्रवाहच गोठल्यासारखा झाला. मग हळूहळू ‘लस’ आली. तोपर्यंतच्या काळातले सण-समारंभ, यात्रा-पर्यटन, शिक्षण-मनोरंजन सर्वकाही थिजलं. काळ तर मोठा कठीण आला होता. त्यातच निसर्गाच्या अवकृपेने भर घातली. या सर्वांशी लढताना अनेकांना आपले सुहृद गमवावे लागले. हातचं काम आणि तोंडचा घास गेला.
आता हळूहळू दूर क्षितिजावरती कोठे नवी आशा फुलते आहे, अंधाराचे पर्व संपून पुन्हा नव्याने उजाडते आहे असं वाटतंय. तरीही काळजी घेऊनच दीपावली साजरी करूया. मुख्यत्वे मनामनात जिद्द आणि यत्नदीप तेवत ठेवूया. कारण उद्याच्या वैभवाचे रत्नदीप लावायचे तर आज ‘यत्नदीप’ म्हणजेच प्रयत्न करणे भाग आहे. काही ठिकाणी तर शून्यातून पुन्हा उभारी घ्यावी लागेल अशी परिस्थिती आहे. हीच अदृश्य संकटांशी लढण्याची वेळ आहे.
‘उद्योगिनं पुरुषसिंहमुलैति लक्ष्मी, देवेनदेयमिती कापुरुषा वदन्ति’ असं एका संस्कृत सुभाषितात म्हटलंय. याचा उल्लेख करून लोकमान्य टिळक यांनी तरुणांना आवाहन केलं होतं. की विपरीत परिस्थितीवर मात करण्याची ईर्ष्या बाळगा, प्रयत्नशील राहा. हे कसं साध्य होईल? असा किंतु मनात न आणता कामाला लागा. अर्थात मनातला अंधार दूर करा. सुरुवातीला उल्लेख केला तो धनत्रयोदशीचा. धनसंपत्ती उद्योगजतेमुळेच निर्माण होते आणि विज्ञानाच्या मार्गाने विचार केला तर साध्या, नगण्य वाटणाऱ्या गोष्टीतूनही एखादा व्यवसाय उभारून लाखो-करोडोंचे व्यवहार उभे राहू शकतात. काही संशोधक अशा गोष्टींवर संशोधन करत असल्याचं त्यांच्याशी बोलल्यावर समजतं. उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी… या गाण्यातील समृद्धी उद्योजकतेवरच अवलंबून आहे.
आज औद्योगिक सुरक्षा दिवसही आहे. नवनव्या उद्योगातून अर्थकारण गतिमान झालंच पाहिजे, पण त्याचबरोबर पर्यावरण आणि सुरक्षेची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं. अन्यथा त्यातून निर्माण होणारी संपत्ती सर्वार्थाने सुख देऊ शकत नाही. गेली दीड-पावणे दोन वर्षे थबकलेलं अर्थचक्र आता गतिमान करावं लागेल. काम मागणाऱ्या हातांना योग्य ते काम मिळेल अशी व्यवस्था करावी लागेल. तसं घडलं तरच गरीबाच्या झोपडीतला अंधार दूर होईल आणि तरच श्रीमंतांचं वैभवही अर्थपूर्ण ठरेल. शेतकरी, कामकरी आणि समाजातील सर्वच घटकांचे ‘दुरितांचे तिमिर जावो’ आणि व्यवसाय, उद्योगांना गती प्राप्त होऊन प्रत्येक तिथी ज्ञानसंपन्न, धनसंपन्न तसंच आरोग्य संपन्न ठरो हीच सदिच्छा!
























































