
>> दिलीप देशपांडे
यंदाची दिवाळी थोडी वेगळी आहे असं म्हणायला हरकत नाही।… कारण एकीकडे नुकताच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालाय. लोकांच्या मनात उत्साह तर आहेत, पण त्याचबरोबर निर्बंध हे आहेतच. अर्थातच ते हवेच. कारण एकूणच सगळ्यांच्या मनातली भीती कमी झाली असली तरी धोका हा आहेच. त्यामुळे आज जे बाजारपेठेत निर्बंध झुगारून गर्दी दिसत आहे. त्यातही जरा सावधानता हवी. एकूणच आहे त्या परिस्थितीत संयमाने, नियमांचे बंधन पाळून, आपल्या कुटुंबीयांची काळजी घेऊनच दिवाळीचा आनंद घ्यावयाचा आहे
साधारणपणे दसरा झाल्यानंतर सगळ्यांनाच, लहान- मोठय़ांना दिवाळीचे वेध लागतात. आपण सर्वच दिवाळीची आतुरतेने वाट बघत असतो. बाजारपेठा फुलू लागतात. आताही बाजारपेठा फुललेल्या आहेत रंग, रांगोळ्या, आकाशदिवे, फटाके, फराळाचे पदार्थ, झेंडूची फुले, शेवंतीच्या वेण्या, गजरे, आदी गोष्टींची बाजारपेठेत रेलचेल असते. ती आताही आहे. गेल्या दोन वर्षांत हे सगळं बंद होतं, परंतु आता काही प्रमाणात कोरोनाची साथ कमी झाल्याचे जाणवले. त्यामुळे नाटय़गृहे, सिनेमागृहे, हॉटेल्स, मॉल्स, या सर्वांना परवानगी मिळाल्याने सर्वदूर आता ग्राहकांची गर्दी बघायला मिळत आहे. रस्ते अक्षरशः वाहू लागले आहेत. दिवाळी म्हणजे आनंदोत्सव. मनाला आनंद यातून मिळत असतो. दिवाळी म्हणजे फराळ, फटाके, कपडे खरेदी, वाचनासाठी दिवाळी अंक, एकमेकांच्या गाठीभेटी. काही लोकांनी दिवाळीनिमित्ताने आणि दिवाळी ही पर्यटनस्थळी साजरी करण्याचे बेत हे सगळं बघायला मिळतं. साधारणपणे कराष्टमीपासूनच दिवाळीची सुरुवात होते असे म्हणायला हरकत नाही. कारण त्याच दिवशी अनेक ठिकाणी आणि घरांवर विद्युत रोषणाई, आकाशदिवे लावले जातात. आम्ही पण घरीच आकर्षक दिवा बनवत होतो. आता त्या गोष्टीला चाळीस-पंचेचाळीस वर्षांचा काळ लोटला. त्यावेळी बहुतेक ठिकाणी आकाशदिवे हे घरीच बनवले जात होते.पंधरा दिवस आधी हा कार्यक्रम सुरू व्हायचा.
परंतु आता बाजारात निरनिराळ्या प्रकारचे आकर्षक आणि त्यात विजेची दिवे लावून मिळतात. तसेच वेगवेगळ्या प्रकारात, रंगाचे असतात. त्यामुळे आता शक्यतोवर घरी कोणीच आकाशदिवे बनवत नाहीत.
हीच परिस्थिती फराळाची आहे. काही वर्षांपूर्वी घरोघरी चकली, अनारसे, करंज्या, शेव, चिवडा, लाडू हे पदार्थ महिलावर्ग घरीच बनवायचे. तळणाचा वास असायचा. परंतु आता बदलत्या परिस्थितीत अनेक ठिकाणी हे पदार्थ तयार करून त्याच्या दिवाळीआधी ऑर्डर स्वीकारल्या जातात. काही ठिकाणी हे पदार्थ बनवून देणारे कारागीर अपार्टमेंटमध्ये जाऊन महिलावर्गाला फराळाचे पदार्थ मजुरी घेऊन बनवून देतात. त्यामुळे दिवाळीआधीच आठ दिवस अशा कारागिरांकडे महिलांची रांग लागलेली असते. तर दुसरीकडे बाजारपेठ फराळाच्या दुकानांची खूप मोठय़ा प्रमाणात स्टॉल्स उघडलेली असतात आणि माफक दरात त्याची विक्री होत असते. असे काही बदल काळानुसार होऊन आता घरी दिवाळीचे पदार्थ बनवायची प्रथा पद्धत कमी झाली आहे. अगदी तुरळक प्रमाणात काही महिला ते घरी बनवतात.
दिवाळीचा काळ तसा सहाच दिवसांचा. गोवत्स/वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज.
दिवाळीचा हा पाच-सहा दिवसांचा काळ म्हणजे एक आनंद पर्वणी असते. अशा प्रकारे हे उत्सव-सण हे एकूणच मनाला आनंद देऊनच वर्षभर यातून ऊर्जा-उत्साह मिळत असतो. यामागे जसे सांस्कृतिक, धार्मिक आध्यात्मिक महत्त्व आहे तसेच या सर्व उत्सव- सणामागे वैज्ञानिक महत्त्वसुद्धा आहे. म्हणून आपण या दिवसांची आतुरतेने वाट पाहत असतो. आणि बघा, आपण वर्षभरात हे सर्व पदार्थ खात असतो, परंतु ऐन दिवाळीच्या दिवसात बनवलेल्या चकल्या, शेव, चिवडा, अनारसे, शंकरपाळे यांची चव काही वेगळीच असते. म्हणूनच नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अभ्यंगस्नानानंतर चकलीबरोबर चहा सोबतीला हातात दिवाळी अंक म्हणजेच साहित्यिक फराळ, गुलाबी थंडी ही मजा काही औरच असते, ती दिवाळीतच अनुभवायला मिळते…ऐन दिवाळीत दिवाळी पहाट…पाडवा पहाट…सारखे कार्यक्रमाचे आयोजन होते. आताही अनेक मोठय़ा शहरांमध्ये होणार.
मात्र यंदाची दिवाळी थोडी वेगळी आहे असं म्हणायला हरकत नाही।… कारण एकीकडे नुकताच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालाय. लोकांच्या मनात उत्साह तर आहेत, पण त्याचबरोबर निर्बंध हे आहेतच. अर्थातच ते हवेच. कारण एकूणच सगळ्यांच्या मनातली भीती कमी झाली असली तरी धोका हा आहेच. त्यामुळे आज जे बाजारपेठेत निर्बंध झुगारून गर्दी दिसत आहे. त्यातही जरा सावधानता हवी. याचे भान हवे.
कारण सरकारी पातळीवरुन आरोग्य विभागाकडून वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. आपण बघतोय की रस्ते भरभरून वाहत आहेत. जवळपास 50 ते 60 टक्के जनता मास्कचा वापर करत नाही हे योग्य आहे का? दोन डोस घेतले म्हणजे आता आपण मुक्त ही भावना काढून टाकावी. मास्क लावणे, हात धुणे, अंतर ठेवणे, रस्त्यावर न थुंकणे या गोष्टी ही आपली जबाबदारी आहे. तेव्हा ती टाळू नये.
दुसरी गोष्ट ती म्हणजे प्रदूषणाची. फटाक्याशिवाय दिवाळी नाही हे समीकरण आहे. परंतु आता त्यात थोडा बदल करावा लागणार आहे, तो म्हणजे फटाके फोडणेत थोडी कपात करणे. कारण त्यात ध्वनिप्रदूषण-वायू प्रदूषण ही तर महत्त्वाची कारणे आहेतच, परंतु नेहमी त्यातून होणारे धोके व इजा त्यामुळेच याबाबतीत खबरदारी घेतली तर आपली दिवाळीही आरोग्यदायी, आनंदायी होऊ शकणार आहे. आता पणत्यांची आरास, झेंडूची फुलांची आरास करावी.
तिसरी गोष्ट आहे ती महागाईमुळे झालेली कोंडी. बाजारपेठ जरी फुलली असली तरी एकाएकी खरेदीची सर्वसामान्यांची हिंमत नाही. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भडकल्या आहेत. तेल, तूप, डाळी, मिठाई, फटाके, कपडेलत्ते आणि एकूणच सर्व वस्तू त्यात आल्यात. पेट्रोल-डिझेल यांचे भाव कुठल्या कुठे गेलेत. आता प्रवासही महागला आहे. मोटारसायकल, कार या आता चैनीच्या वस्तू राहिलेल्या नाहीत. आवश्यक बाबी आहेत. एकूणच जनतेच्या मनात एक गोष्ट मात्र खदखदते आहे ती म्हणजे अच्छे दिन कधी येणार? का तोपर्यंत थांबायचं दिवाळी साजरी करायला मध्यमवर्गीयांनी.सामान्यांनी? मध्यमवर्गीयांची, सर्वसामान्यांची दिवाळी साजरी करण्याची संकल्पना आणि तो दिवाळीचा आनंद मिळणे याकडे केंद्र सरकालरने बघणे आवश्यक आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱयांचे अतोनात नुकसान झाले आहे, पण नुकसानभरपाईची रक्कम कधी मिळते निदान दिवाळीआधी मिळाल्यास त्यांची दिवाळी आनंदात जाईल. महागाई तर कमी होणे शक्य नाही. एकूणच आता आहे त्या परिस्थितीत संयमाने, नियमांचे बंधन पाळून, आपल्या कुटुंबीयांची काळजी घेऊनच दिवाळीचा आनंद घ्यावयाचा आहे.
n dilipdeshpande24@gmail. com




























































