
राहुल द्रविड याच्यासारखा मोठा चेहेरा तुम्ही टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून आणलाय. आता द्रविड याच्या व्हिजनसह त्याला पुढचे काम करू द्या. संघाला प्रशिक्षण कसे द्यायचे हे त्याला शिकवायला जाऊ नका, अशा शब्दांत हिंदुस्थानचे माजी कसोटीपटू आणि अष्टपैलू क्रिकेटर अजय जाडेजा याने हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सुनावले.
द्रविडला संघ कसा चालवायचा हे सांगू नका आणि त्याला स्वतःच्या दृष्टीने मुक्तपणे हे काम करू द्या. शिस्त आणि समर्पणाचा आदर्श असेल तर तो राहुल द्रविड आहे. तुम्हाला प्रशिक्षकाकडून खूप काही हवे असते. पण शिस्त आणि समर्पण या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जेव्हा कोणी हिंदुस्थानी संघप्रशिक्षक बनतो, जर तुम्ही त्याला काम करू दिले नाही किंवा त्याची दृष्टी वापरली नाही तर हे सर्व प्रयत्न निरर्थक ठरतील,असे जाडेजा म्हणाला. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपासून द्रविड मुख्य प्रशिक्षक म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ सुरू करणार आहे.




























































