मुंबईची कोरोना ‘इम्युनिटी पॉवर’ तपासणार, जानेवारीत पालिकेकडून सहाव्या सेरो सर्व्हेचे नियोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गेल्या वर्षी 16 जानेवारीला लसीकरणाला सुरुवात झाली असून जानेवारी 2022 मध्ये लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. मात्र लसीकरण पूर्ण झाले तरी लस घेतल्यानंतर मुंबईकरांमध्ये कोरोनाचा सामना करण्यासाठी निर्माण झालेली रोगप्रतिकारशक्ती पालिकेकडून तपासली जाणार आहे. यासाठी जानेवारीत सहाव्या सेरो सर्वेक्षणाचे नियोजन पालिकेने केले आहे. यामध्ये डोस घेतल्यामुळे आणि डोस न घेताही असलेल्या ‘इम्युनिटी पॉवर’ची तपासणी पालिकेकडून केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

मुंबईत पालिका, खासगी आणि सरकारी अशा 461 पेंद्रांवर लसीकरण सुरू आहे. यामध्ये 18 वर्षांवरील पात्र सुमारे 92 लाख लाभार्थ्यांपैकी 63 टक्के नागरिकांना दुसरा तर 95 टक्क्यांहून जास्त पात्र लाभार्थ्यांनी पहिला डोसही घेतला आहे. यातच कोरोना रुग्णसंख्याही मुंबईत घटली आहे. मात्र सद्यस्थितीत वाढलेली गर्दी आणि आगामी काळातील कार्यक्रमांत वाढणाऱया संभाव्य गर्दीमुळे कोरोना वाढण्याचा धोका असल्यामुळे पालिका सावधगिरी बाळगत आहे. तिसरी लाट रोखण्यात यश आल्याचे बोलले जात असले तरी अजून सुमारे दोन महिने काळजी घ्यावी लागणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. या काळात कोरोना खबरदारी घ्यावी, असे आवाहनही पालिकेने केले आहे.

…तर बुस्टर डोसही घ्यावा लागेल

काही देशांत कोरोनाची तिसरी लाटही आली आहे. त्यामुळे आपल्यालाही काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी सेरो सर्वेक्षणातून कोरोनाचा सामना करण्यासाठी निर्माण झालेली प्रतिपिंडे तपासली जाणार आहेत. यातून शरीरात आढळणाऱया प्रतिपिंडांच्या प्रमाणावर बुस्टर डोस घ्यावा लागेल का, याबाबतचा निर्णय घेतला जाईल. मात्र यासाठी आयसीएमआरकडून गाईडलाइन आल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.