
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या सात वर्षांत जनतेकडून इंधन दरवाढीच्या नावाखाली 23 लाख कोटींची वसुली केली असून, हिंदुस्थानातील जनतेची त्यांच्याकडून पिळवणूक झाली आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. देशात मोठय़ा प्रमाणात लसीकरण केल्याचा दावा केला जात असला तरी याबाबतीत जगात आपला 144 वा क्रमांक आहे, हे मोदी सरकार आणि त्यांच्या समर्थकांनी लक्षात घ्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
सातारा येथे पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी कोरोना महामारी, इंधन दरवाढ, लॉकडाऊन, महागाई या विषयांवरून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. हिंदुस्थानात मोठय़ा प्रमाणात लसीकरण झाल्याचा दावा मोदींनी केला आहे. मात्र, जगात आपला क्रमांक 144 वा आहे; याचा अर्थ 143 देशांनी आपल्यापेक्षा लसीकरणात चांगले काम केले आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर लोक नाराज असून, आता लोक बोलू लागले आहेत. गेल्या सात वर्षांत त्यांनी पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढ करून गोरगरिबांच्या खिशातून 23 लाख कोटी गोळा केले आहेत. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल आल्यानंतर मोदी सरकारने इंधन दरवाढ थोडी कमी केली. सरकार लस प्रमाणपत्रावर मोदी स्वतःचा फोटो छापत आहे. कारण लोक विसरतील अशी त्यांना भीती आहे.
भाजपने आमचा नाद सोडला; सरकार पाच वर्षे टिकणार
महाविकास आघाडी सरकारला आता दोन वर्षे पूर्ण होत आली असून, सरकार पडावे म्हणून भाजपने अनेक प्रयत्न केले. मात्र, त्यात यश आले नाही, असे सांगून चव्हाण म्हणाले, तीन पक्षांचे सरकार आज पडेल, उद्या पडेल, अशी वल्गना भाजपकडून केली जात होती. मात्र, आता त्यांनी आमचा नाद सोडून दिला आहे. कारण सरकार पाच वर्षे पूर्ण करणार आहे.




























































