
>> शिरीष कणेकर
माझा ‘इंडियन’ एक्सप्रेस’मधला जुना वार्ताहर सहकारी अशोक रावकवी याचा सकाळी सकाळीच मला फोन आला.
‘काय रे, काही विशेष?’ मी म्हणालो.
‘फार नैराश्य आलं होतं रे. म्हटलं तुला फोन करावा.’
‘नैराश्य वाढविण्यासाठी की कमी करण्यासाठी?’ मी कंपल्सरी विनोद म्हणून खपून जाईल असं काहीतरी बोललो.
त्यानं उगीचच हसल्यासारखं केलं. तेही रडल्यासारखं आलं.
‘बरं बोल.’ मी नरम येत म्हणालो.
‘आपल्या वेळेला कोणा पत्रकाराकडे गाडी होती? आज किती जणांकडे आहे मोज. कुठून आला हा पैसा?’
‘सोड रे.’ मी पुचाटपणे अंग काढून घेत म्हणालो. आता नवीन वाद ओढवून घेण्याची, दहा नवीन शत्रू उभे करण्याची शारीरिक व मानसिक ताकद माझ्यात शिल्लक नव्हती. लागले नेत्र रे पैलतिरी…
‘एकानं दुसऱयावर शंभर कोटी खाल्ल्याचा आरोप केला की दुसरा उलटून पहिल्यावर दोनशे कोटी खाल्ल्याचा आरोप करतो. दोन दोन चौकशी समित्या नेमल्या जातात. संबंधित कथित गुन्हेगार आधी मिशा वाढवतात व मग त्यांना साजूक तूप लावून पीळ भरतात. मी जेवणात तूप वापरून तुपाचा दुरुपयोग करतो. तिकडे कोरडय़ा मिशा तुपाची वाट पाहत असतात. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी.’
‘अशोक, शांत हो.’
‘कसा शांत होऊ?’ अशोक उसळून म्हणाला, ‘आपण कधी पैसे खाल्ले होते का रे?’
‘कोणी देऊ पण केले नव्हते,’ मी पुटपुटत म्हणालो, ‘त्यामुळे असेल कदाचित पैसे खाण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही. पगारही आजच्या मानानं खूपच कमी होते. आपल्याला नोकरी आहे व पगार मिळतो. याचेच धन्य वाटण्याचे ते मंतरलेले दिवस होते. पोलिसांप्रमाणेच आपणही सर्वसामान्य जनतेचे कैवारी व रक्षक आहोत या भावनेनं पेटून उठून आपण एका धुंदीत जगलो.’
‘आणि आज पोलीस कमिशनरच फरारी होतो.’ अशोक म्हणाला.
‘कुंपणच शेत खातंय.’ मी म्हणालो. लगेच ‘फेन्स इन इटिंग द क्रॉप्स’ असे अशोकला कळायला सोपं जावं म्हणून इंग्रजीत भाषांतर करून सांगितले.
अशोक निर्माता-दिग्दर्शक (‘भाबी की चुडिया’) सदाशिव रावकवींचा थोरला सुपुत्र. त्यानं एकदा त्याच्या ऐसपैस बाल्कनीत पांढऱया कपडय़ात काहीतरी गुंडाळून लटकवत ठेवलं होतं.
‘काय आहे रे हे?’ मी सहज विचारलं.
‘वडिलांची हाडं रे.’
‘हाडं?’ मी किंचाळलो.
‘अस्थी म्हणायचंय त्याला.’ कोणीतरी सांगितलं.
मला बरंच काही विचारायचं होतं, पण माझी जीभ रेटली नाही.
या अशोकनं वडिलांचा अकाली मृत्यू पचवला होता, पण देशाची सद्यस्थिती त्याला बघवत नव्हती. त्याच्या संवेदनशील मनाला यातना होत होत्या. मनाची तडफड होत होती. मग तो उठून माझा फोन घुमवत होता – ‘काय चाललंय काय, शिरीष? आय कान्ट टेक इट एनी लाँगर. तू स्वस्थ कसा बसू शकतोस?’
‘अगतिक आहे. हतबल आहे. आपण काही करण्याच्या परिस्थितीत आहोत यावरचा विश्वास उडालाय. वयानं आणि आजारांनी लोळवलंय. विचार करण्याचीदेखील भीती वाटते. शंभर कोटी म्हणजे शंभरावर किती शून्य असतात, अशोक? एवढे पैसे त्यांना कशाला लागतात? मी रात्रंदिवस वस्तीला असतो त्या माझ्या दिवाणखान्यात गेली किती वर्षे मला ए.सी. बसवून घ्यायचाय. उन्हाळय़ात अंगाची लाही लाही होते. ए.सी. घ्यायचाय, पण त्याची किंमत मी विचारलेली नाही. ती आपल्याला झेपणारी नाही हे आपसूकच मला कळलंय. परवा एका वाचकानं मला विचारलं, ‘तुमच्याकडे सी.डी. प्लेयर असेलच?’ मी त्याला शांतपणे व स्पष्टपणे एका शब्दात लिहिले, ‘नाही.’ माझ्याकडे शब्दांची श्रीमंती असेलही पण त्यावरून माझ्या ऐहिक सुखाची गणती ही माणसं का करतात? टॅक्सी करण्यापूर्वी मी दहादा विचार करतो हे कळल्यावर त्यांना धक्का कसला बसतो?
‘परवा मला एक टॅक्सीवाला सांगत होता की, त्याची मुलगी त्याला म्हणाली की, बाबा खूप दिवसांत पालक-पनीर खाल्लं नाही. तुम्ही येतान पालक आणा. आपण करू… टॅक्सीवाला भाजीबाजारात गेला. पालकाची किंमत ऐकून त्याच्या तोंडचं पाणी पळालं. तो रिकाम्या हातानंच घरी परतला. त्याच्या मुलीनं एका शब्दानंही विचारलं नाही. तिनं विचारलं नाही याचं मला जास्त वाईट वाटलं… साहेब, आपण कुठे चाललोय?
‘वडाला, हे विनोदी उत्तर मी घशातील अवंढय़ाबरोबरच गिळलं.’ काही करता येत नसेल तर किमान विनोद करू नका. दुःखावर डागण्या देण्याचं पाप करू नका.
‘शिरीष, आपण तीनचार जुने सहकारी भेटू या. जुन्या रम्य आठवणी जाग्या करू या. किश्श्यांची देवाणघेवाण करू या. पोटभर हसून घेऊ या. यू नेव्हर नो व्हेन यू विल गेट चान्स टु लाफ अगेन…’ अशोक भावनाविवश होत म्हणाला.
‘बरोबर.’ मी म्हणालो, ‘या जगात आपलं आता काही काम नाही, चलो निकल जाये, हे सोडून सगळं काही बोलूया.’





























































