डॉ. सुनील पोखरणा यांना न्यायालयाचा तात्पुरता दिलासा, अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्हा रुग्णालयातील अग्नितांडवप्रकरणी अटकेच्या शक्यतेने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करीत तात्पुरता दिलासा दिला आहे. याप्रकरणी 17 नोव्हेंबरला सुनावणी होणार असून, पोलिसांना म्हणणे सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

नगर जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागात 6 नोव्हेंबर रोजी आग लागली होती. यात 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी रुग्णालय प्रशासनाकडून पोलिसांत घटनेची नोंद न आल्यामुळे पोलिसांनीच स्वतःहून कलम 304(अ)नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर या गुह्यात 304 कलम वाढविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, स्टाफ नर्स सपना पठारे, आस्मा शेख, चन्ना आनंत यांना अटक करण्यात आली. रुग्णालय प्रशासनाचे प्रमुख डॉ. पोखरणा यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पुढे येत आहे. त्यामुळे या गुह्यात अटकेच्या शक्यतेने डॉ. पोखरणा यांनी शुक्रवारी (दि. 12) ऍड. पी. डी. कोठारी यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. शनिवारी न्यायमूर्ती एम. आर. नातू यांच्यासमोर सुनावणी झाली.

तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुह्यात डॉ. पोखरणा यांना अटक करण्यासाठी कोणतेही कारण सध्या दिसून येत नाही, असे मत नोंदवीत न्यायालयाने डॉ. पोखरणा यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तपास अधिकाऱयांना तपासात सहकार्य करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. पुढील सुनावणी 17 नोव्हेंबरला होणार असून, पोलिसांना म्हणणे सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

चौघांच्या जामिनावर उद्या सुनावणी

जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेप्रकरणी दाखल गुह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या वैद्यकीय अधिकारी शिंदे यांच्यासह स्टाफ नर्स शेख, पठारे व चन्ना यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केले असून, या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.