
बाळकृष्णाच्या मूर्तीवर इलाज करण्याचा हट्ट धरून एका पुजाऱ्याने थेट रुग्णालय गाठल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील रुग्णालयात हा प्रकार घडल्याचं उघड झालं आहे.
आग्र्यातील जिल्हा रुग्णालयात शनिवारी एक विचित्र प्रकार घडला. या परिसरात ख्वासपुरा खेरिया येथे पथवारी देवीचं मंदिर आहे. या मंदिरात लेखराज नावाचा इसम पुजारी म्हणून काम करतो. शनिवारी तो अचानक जिल्हा रुग्णालयात दाखल झाला.
त्याच्या हातात लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळेलली बाळकृष्णाची मूर्ती होती. लेखराज यांच्या म्हणण्यानुसार, ते सकाळी पाच वाजता बाळकृष्णाची पूजा करत असताना त्यांच्या हातून मूर्ती खाली पडली. त्यामुळे बाळकृष्णाला लागलं असून तुम्ही बाळकृष्णावर इलाज करा, असा लकडा त्याने डॉक्टरांपाशी लावला.
आता बाळकृष्णाच्या मूर्तीच्या हातावर इलाज कसा काय बुवा करायचा, असा प्रश्न डॉक्टरांना पडला. त्यांनी लेखराज यांना समजवायचा प्रयत्न केला. पण लेखराज कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी बाळकृष्णाच्या मूर्तीवर इलाज करा, असा हट्टच धरला. डॉक्टर ऐकत नाही असं पाहून त्यांनी रडायला देखील सुरुवात केली.
डॉक्टरांनी अखेर बाळकृष्णाच्या मूर्तीला प्लास्टर घातलं तेव्हा लेखराज शांत झले. त्यांनी मूर्ती जशी आणली होती, तशीच गुंडाळून परत घेऊन गेले.






























































