दुबईत महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा डंका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राच्या लोककलेला डंका देशातच नव्हे तर परदेशातही वाजला आहे. दुबई येथे झालेल्या द वर्ल्ड एक्स्पो महोत्सवात राज्यातील लोककलावंतांनी आपली कला सादर करून रसिकांची मनं जिंकली. शाहिरांचा डफ दुबईत कडाडला तर लावणीच्या घुंगरांनी रसिकांना खिळवून ठेवले. लोककलावंतांनी आपल्या कलेची, परंपरेची छाप जागतिक पटलावर उमटवली.

दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव मुंबई, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग आणि औद्योगिक विकास महामंडळ यांच्या वतीने दुबईत 18 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत वर्ल्ड एक्स्पो पार पडला. महोत्सवात शनिवारी लोककलांचे सादरीकरण झाले. वासुदेव, देवीची गाणी, करपल्लवी, शब्द वेद, भारुड, पोवाडा, शाहिरी, लावणी या लोककलांनी दुबईचा मंच गाजवला. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभागप्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहीर सुरेश जाधव, शाहीर देवानंद माळी, माया खुटेगावकर, शाहीर प्रसाद विभूते, कल्पना माळी, शाहीर अवधूत पवार, शाहीर प्रवीण जाधव, माधवी माळी, नितीन प्रधान, शाहीर अमित शिंदे, राजेंद्र घोलप, नितीन शिंदे, प्रमिला सूर्यवंशी, पूनम जावळे, सृष्टी अंधारे, प्रतीक्षा, गायिका प्राजक्ता महामुनी, हार्मोनियम वादक सुभाष खरोट आदींनी सादरीकरण केले. लोककसंगीताला भाषेची अडचण नसते. जगभरातील उद्योजक आणि रसिकांनी महाराष्ट्राच्या लोकपरंपरेला भरभरून दाद दिली. कलावतांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या समन्वयक सुखदा खैरे आणि सूत्रधार डॉ. गणेश चंदनशिवे होते. या वेळी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे कैलास पगारे उपस्थित होते.