
जयगड समुद्रात 26 ऑक्टोबर रोजी मासेमारीसाठी गेलेली नावेद 2 ही नौका बुडून बेपत्ता झाली. या घटनेला आता एक महिना होत आहे. या बेपत्ता नौकेचा अद्यापही शोध लागलेला नाही. या बेपत्ता नौकेचा गेल्या महिनाभरात साधा अवशेषही सापडला नाही. नौकेवरील 6 खलाशांपैकी 5 खलाशी अद्यापही बेपत्ता आहेत. जयगड समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या नौकेचे अवशेष न सापडल्यामुळे जयगड समुद्रात बर्म्युडा ट्रँगल तयार झाला की काय असा सवाल मच्छिमार विचारत आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून त्यांच्याकडून येणाऱ्या अहवालाची मच्छिमारांना प्रतिक्षा आहे.
जयगड येथील नावेद 2 ही मच्छिमार नौका 26 ऑक्टोबरपासून बेपत्ता झाली. नौकेशी संपर्क होत नव्हता. बेपत्ता झालेल्या नौकेवर 6 खलाशी होते. त्यांच्यापैकी एका खलाशाचा मृतदेह सापडला. उर्वरित पाचजणांचे मृतदेह अद्यापही सापडले नाहीत. बुडालेल्या नौकेचा एक अवशेषही न सापडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. समुद्रात वादळ वारा नसताना नावेद नौका बुडाली कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे. समुद्रातील मालवाहू जहाजाला धडक बसून अपघात झाल्याची चर्चा मच्छिमारांमध्ये आहे. या संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक घेतली. या बैठकीत या नौकेचा पुन्हा तपास करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. एक महिना उलटत आला तरी मच्छिमार नौकेचा पत्ता न लागल्यामुळे जयगड परिसरातील मच्छिमारांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जयगड मच्छिमार संस्थेची एक बैठकही नुकतीच झाली.
येणाऱ्या-जाणाऱ्या नौकांना टोकन नंबर
नावेद 2 ही नौका बुडाल्यानंतर अनेक प्रश्न पुढे आले. समुद्रात जाणाऱ्या नौकांची नोंद होत नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी तात्काळ समुद्रात जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व नौकांची नोंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी त्यांना टोकन नंबर देण्याची सूचना त्यांनी केली आहे. या टोकन नंबरमुळे कुठली नौका कुठे आहे याचा शोध घेणे सोपे होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या सूचनेची बंदर विभाग आणि मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त कशी अंमलबजावणी करतात, याची प्रतीक्षा आहे.
जयगडमध्ये बुडालेल्या नौकेचा पोलीस तपास करत आहेत. मी कालच याबाबत पोलीस विभागाशी चर्चा केली. त्यांचा तपास अंतिम टप्प्यात आला असून दोन दिवसात ते याबाबत अहवाल देतील.
– डॉ. बी.एन.पाटील, जिल्हाधिकारी, रत्नागिरी





























































