
स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधान परिषदेवर निवडल्या जाणाऱया सहा जागांसाठीची निवडणूक 10 डिसेंबर रोजी होणार आहे. मात्र या निवडणुकीआधीच मुंबईतील दोन जागांवर शिवसेनेचे माजी आमदार सुनील शिंदे व भाजपचे राजहंस सिंह यांची निवड बिनविरोध होणार हे निश्चित झाले आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक सुरेश कोपरकर यांनी अपक्ष म्हणून भरलेला निवडणूक अर्ज आज मागे घेतल्याने या दोघांचा विधान परिषद आमदारकीचा मार्ग सुकर झाला आहे.
शिवसेनेचे वरळी विधानसभेतील माजी आमदार सुनील शिंदे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांतून निवडल्या जाणाऱया विधान परिषदेच्या मुंबईतील जागेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांच्यापाठोपाठ भाजपकडून राजहंस सिंह यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. काँग्रेसकडून भाई जगताप हे उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी अपेक्षा असतानाच मुंबई महापालिकेतील बहुमताचे गणित न जुळल्याने काँग्रेसकडून कोणीच अर्ज भरला नाही. मात्र काँग्रेसचे माजी नगरसेवक सुरेश कोपरकर यांनी अपक्ष अर्ज भरल्याने मुंबईतील विधान परिषद निवडणुकीतही चुरस निर्माण होणार अशी शक्यता निर्माण झाली होती. पण त्यांनी आज दुपारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचे उमेदवार सुनील शिंदे आणि भाजपचे उमेदवार राजहंस सिंह यांची निवड आता बिनविरोध होणार आहे.
राज्यातील उर्वरित चार जागांवर चुरस
राज्यातील उर्वरित चार जागांसाठीची विधान परिषद निवडणूक चुरशीची होणार अशीच चिन्हे आहेत. उद्या निवडणूक अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून या चार ठिकाणी उमेदवारी मागे घेतली जाण्याची शक्यता फारच कमी आहे. कोल्हापुरातून काँग्रेसचे गृह राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याविरोधात भाजपचे उमेदवार अमल महाडिक, धुळे-नंदूरबारमधून भाजपचे अमरीश पटेल यांच्याविरोधात काँग्रेसचे गौरव देवेंद्रलाल वाणी अशी लढत होणार आहे, अकोला-वाशिम-बुलढाणामधून शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यांच्याविरोधात भाजपकडून वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात काँग्रेसचे रवींद्र भोयर असा सामना रंगणार आहे.
































































