शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील तिघा आरोपींची फाशीची शिक्षा रद्द; न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱया मुंबईतील शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील फाशीची शिक्षा सुनावलेल्या तिघा आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. बलात्काराची घटना अत्यंत घृणास्पद असली तरी घटनेचा विचार करता हे प्रकरण फाशीचे नाही असे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठाने तिघा आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एवढेच नव्हे तर स्त्रीकडे भोगवस्तू म्हणून पाहणाऱया आरोपींची फाशी रद्द झाली असली तरी नराधमांचा नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत ते जन्मठेपेच्या शिक्षेस पात्र आहेत असेही खंडपीठाने आपल्या आदेशात नमूद केले.

मुंबईतील शक्ती मिल कंपाऊंड येथे 22 ऑगस्ट 2013 साली विजय जाधव, मोहम्मद कासीम बेंगाली, मोहम्मद सलीम अन्सारी, सिराज खान आणि एका अल्पवयीन मुलाने महिला छायाचित्रकारावर बलात्कार केला होता. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपींना 4 डिसेंबर 2014 साली फाशीची शिक्षा सुनावली, तर अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. या शिक्षेला आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले, मात्र उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. आरोपींची शिक्षा निश्चित करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज हा निकाल न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केला. 108 पानी निकालपत्रात न्यायालयाने आरोपींच्या कृत्यावर संताप व्यक्त करत बलात्काराची प्रत्येक घटना धक्कादायक आणि क्रूर असते असे निरीक्षण नोंदवले. तसेच ही घटना घडली तेव्हा लोक प्रचंड संतापले होते. पण आम्हाला कायद्याचा विचार करावा लागतो, लोकांच्या मागणीनुसार शिक्षा ठोठावता येत नाही, फाशी हा एक अपवाद असून कायद्यानुसार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा योग्य राहील, असे मत खंडपीठाने निकालात नोंदवले आहे.

खटल्याचा निःस्वार्थ विचार करणे हे कर्तव्य

न्यायालयाने आदेश देताना त्यात म्हटले आहे की, जनआक्रोश लक्षात घेऊन शिक्षा देणे चुकीचे असून खटल्याचा निःस्वार्थ विचार करणे हे न्यायालयाचे कर्तव्य आहे. बलात्कार हा समाजातील एक भयंकर गुन्हा असताना पीडितेचे झालेले नुकसान हे खूप जास्त आहे. या दुर्घटनेत बलात्कारपीडितेला केवळ शारीरिक इजाच होत नाही, तर तिच्या मानसिक आरोग्यावर आणि जीवनावर गंभीर परिणाम होतो. अशा घटनांमुळे स्त्रीच्या  सन्मानाला आणि प्रतिष्ठेला इजा पोहोचते व तिच्या हक्कांचे उल्लंघन होते.

ठाण्याच्या कासारवडवली येथे तीन वर्षांची चिमुकली पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी बाहेर पडली. त्यावेळी रामकिरत मुनीलाल गौड या नराधमाने तिच्यावर अमानुष अत्याचार केला व तिची हत्या करून मृतदेह चिखलात पुरला. 30 सप्टेंबर 2013 साली ही घटना घडली. आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याविरोधात विशेष ‘पोक्सो’ कोर्टात खटला चालला. ठाणे सत्र न्यायालयाने त्याला मार्च 2019 साली दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली होती. न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठाने सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवत फाशीची शिक्षा योग्य असल्याचे निरीक्षण नोंदवले.

न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठाने ठाणे व बेलापूर येथील बलात्कार  प्रकरणाच्या दोन अन्य प्रकरणांवरही निकाल जाहीर केला. त्यापैकी रहिमुद्दीन मोहफुज शेख ऊर्फ जॉन अँथनी डिसूझा आणि त्याचा साथीदार समाधान शिरसाट ऊर्फ रघू रोकडा या दोघांनी 9 मे 2012 च्या रात्री सीबीडी-बेलापूर पुलाखाली दोन कचरा वेचण्याचे काम करणाऱया मुलींना कॅटरिंगमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत दोघींवर बलात्कार केला आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी 26 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला तर 20 वर्षीय दुसरी मुलगी तिथून निसटली.  घटनेनंतर फरार झालेल्या दोन्ही आरोपींना 11 मे 2017 साली सत्र न्यायालयाने दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची फाशी 2019 साली रद्द केली, तर आज रहीमुद्दीनची फाशी खंडपीठाने रद्द केली.