सीएनजी, घरगुती पाइप गॅस महागला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता आधीच होरपळत असतानाच आता त्यामध्ये सीएनजी आणि घरगुती पाइप गॅसच्या (पीएनजी) दरवाढीमुळे भर पडणार आहे. गॅसची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी जादा दराच्या गॅसची खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे सीएनजीच्या दरात 3 रुपये 6 पैशांची तर पीएनजीच्या दरात 2 रुपये 26 पैशांची वाढ झाली आहे. सदरची वाढ शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू झाल्याचे महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल)ने स्पष्ट केले आहे.

देशात सध्या सीएनजी आणि पीएनजीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. सदरची मगाणी पूर्ण करण्यासाठी महानगर गॅसकडून जादा दराच्या गॅसची खरेदी केली जात आहे. त्यामुळेच गॅसच्या दरात वाढ केल्याचे एमजीएलने स्पष्ट केले आहे. या वाढलेल्या दरामुळे ग्राहकांना प्रतिकिलो सीएनजीसाठी 61 रुपये 50 पैसे तर पीएनजीसाठी 36 रुपये 50 पैसे मोजावे लागणार आहेत. तसेच पीएनजीच्या सध्याच्या स्लॅबनिहाय दराला स्थगिती दिली आहे. त्यामुळे सर्व घरगुती ग्राहकांना एकाच दराने पाइप गॅस मिळणार आहे. दरम्यान, सीएनजीच्या दरात वाढ झाली असली तरी पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा विचार करता सीएनजीचा वापर करणाऱया ग्राहकांची 62 आणि 36 टक्क्यांपर्यंत बचत होणार आहे. तर पीएनजीच्या दराचा विचार करता घरगुती ग्राहकांची 27 टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकणार आहे.