
जिल्हा रुग्णालयातील कोरोनाच्या आयसीयूत झालेल्या अग्नितांडवानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील खासगी रुग्णालये, निवासी खासगी रुग्णालये यांच्या इमारतींचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या 15 डिसेंबरपर्यंत ही तपासणी करून त्याचा सविस्तर अहवाल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला सादर करण्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वैधानिक अधिनियम, कायदा यांच्या मान्यतेनुसार महाराष्ट्र सुश्रुषागृहे नोंदणी अधिनियम 1949, (सुधारित 2021 अन्वये) ग्रामीण भागातील खासगी हॉस्पिटलची नोंदणी आणि नूतनीकरण जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे करणे बंधनकारक आहे. स्थानिक पातळीवर ही तपासणी करण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी यांना तपासणी अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आलेले आहे. शासनाच्या नियमानुसार ग्रामीण भागात आर्थिक वर्षात दोन तपासणी होणे आवश्यक आहे. ही तपासणी करताना संबंधित रुग्णालय, खासगी रुग्णालय यांचे फायर ऑडिट झालेले आहे की नाही, त्या ठिकाणी अग्नी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी झालेली आहे की नाही, याचा सविस्तर प्रस्ताव जिल्हा परिषद आरोग्य विभागास सादर करण्यास सांगण्यात आलेले आहे. तपासणीनंतर संबंधित खासगी रुग्णालयांच्या नोंदणी अथवा नूतनीकरणाच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी की नाही, याबाबतचा अभिप्राय आपल्या अहवालात जिल्हा परिषदेला सादर करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिले आहेत. ग्रामीण भागातील खासगी रुग्णालये आणि दवाखान्यांची तपासणी अहवालाच्या प्रत्येक पानावर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची सही सक्तीची करण्यात आलेली आहे. तसेच, अहवालात स्थळ, वेळ आणि तारीख यांचा सुस्पष्ट उल्लेख करण्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.
अग्नितांडवाचा अहवाल राज्य शासनाला सादर
नगर जिल्हा रुग्णालयाच्या जळीत प्रकरण या संदर्भात नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल तयार करून राज्य शासनाला सोमवारी सादर केल्याची माहिती या समितीचे अध्यक्ष तथा नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे. नगर जिल्हा रुग्णालयाची आयसीयू सेंटरला 6 नोव्हेंबर रोजी आग लागली होत़ी यात सुरुवातीला दहाजणांचा त्यानंतर चारजणांचा असा 14 जणांचा मृत्यू झाला होता. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठांना या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा रुग्णालयाची पाहणी करून विभागीय आयुक्तांमार्फत या घटनेची चौकशी करून राज्य शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्त गमे यांच्या अध्यक्षतेखाली सातजणांची समिती गठीत करण्यात आली होती.























































