
शिरूरच्या पश्चिम भागातील चांडोह, फाकटे परिसरात अवकाळी पाऊस, गारा, कडाक्याच्या थंडीने फटका दिला आहे. वातावरणात झालेल्या या बदलाने शेतात तळावर उघड्यावर असलेल्या सुमारे 40 मेंढ्यांचा थंडीने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नुकसानग्रस्त मेंढपाळांना शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी फाकटे गावच्या सरपंच रेखा बाळासाहेब दरेकर यांनी केली आहे. या अस्मानी संकटाने मेंढपाळांचे व शेती पिकांचे मोठेच आर्थिक नुकसान झाले आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात जेमतेम पडलेल्या पावसाने गुरुवारी पहाटेच्या सुमारास या भागात जोरदार तडाखा दिला. जोरदार वारा,गारांसह रात्रभर पाऊस कोसळत होता. फाकटे येथील संतोष इचके यांच्या शेतात अर्जुन केदारी यांच्या 150 मेंढयांचा तळ लावण्यात आला होता. त्यातील 17 मेंढ्या गारठून मृत्युमुखी पडल्या आहेत. तर गोविंद बाळू शिंदे यांनी दामू रामभाऊ वाळुंज यांच्या शेतात तळ लावला आहे. त्यांच्या 140 मेंढ्यांपैकी 8 मेंढ्या गारठून ठार झाल्या आहेत. तर चांडोह येथे ही चिंधू तांबे यांच्या 8 व इतर अशा सुमारे 40 मेंढ्या गारठून ठार झाल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.पांडुरंग बनसोडे,शेतकरी नवनाथ शेलार यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच जांबूतचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दामोदर गाढवे,सहकारी कर्मचारी अशोक रेणके सकाळी 9 वाजता घटनास्थळी हजर झाले. तर महसूल विभागाचे तलाठी यांनी पंचाने व पशुवैद्यकीय विभागातील वरिष्ठ अधिकारी डॉ. बनसोडे यांनी तात्काळ पंचनाना आणि शेळ्यांचे शवविच्छेदन केल्याची माहिती मेंढपाळांनी दिली. रात्री पाऊसाने तडाखा दिल्याने कवठे येमाई शिवारात अनेक शेतकऱ्यांची कांदा रोपे आणि कांदा पिकास मोठा फटका बसला आहे. तसेच अनेक शेतकऱयांचे कोथिंबीर पिकाचेही मोठेच नुकसान झाले आहे.























































