
गत आठवडय़ात पडलेल्या पावसानंतर गुरुवारी पहाटेपासून जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. मुसळधार पावसामुळे शेतीचे विशेषतः द्राक्ष, ऊस, आंबा पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस, कडेगाव, ईश्वरपूर, वाळवा, शिराळ्यासह परिसरात अवकाळी पावसाने शेतकऱयांची तारांबळ उडाली. ऐन फुलोऱयात आलेल्या द्राक्ष बागांच्या हंगामावर पाणी पडले आहे. गेल्या आठवडय़ात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक द्राक्षबागा बाधित झाल्या होत्या. द्राक्ष बागांमध्ये पाणी साचले असून, द्राक्षांचे घड कुजण्याच्या स्थितीत आहेत. गुरुवारी झालेल्या पावसामुळे सुमारे 31 हजार हेक्टरवरील द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या. द्राक्षबागांचे सुमारे पंधरा हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेतात पाणी साचल्याने ऊसतोडी ठप्प झाल्या आहेत. जिल्ह्यात ऐन हिवाळ्यात मोठा पाऊस झाला. तासगाव, पलूस, मिरज, कडेगाव परिसरात पावसामुळे ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत.
साताऱयात पिके भुईसपाट, स्ट्रॉबेरीत पाणी
सातारा शहरासह जिल्ह्याला कालपासून अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. या पावसाचा महाबळेश्वर, पाचगणीसह जावली तालुक्यात स्ट्रॉबेरीला जबर फटका बसला आहे. तसेच रब्बी पिकांचेही नुकसान झाले आहे. पाऊस आणि हवेत वाढलेल्या प्रचंड गारठय़ाने खटाव तालुक्यात 15, तर वाई तालुक्यात 20 याप्रमाणे एकूण 35 शेळय़ांचा मृत्यू झाल्याने पशूपालकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसामुळे महाबळेश्वर, पाचगणी व भिलार परिसरात स्ट्रॉबेरी पिकाला मोठय़ा प्रमाणात फटका बसला आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने स्ट्रॉबेरीचे पीक कुजून जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जोरदार पावसामुळे ओढे, नाले तुडुंब भरून वाहत असून, रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पावसाचा शहरातील वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले. ऊसशेतीमध्ये पाणी साचल्याने अनेक ठिकाणी ऊसतोड ठप्प झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
कोल्हापुरातील जनजीवन विस्कळीत
ऐन हिवाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यास अवकाळी पावसाने झोडपून काढले. बुधवार दुपारपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने कोल्हापूरकरांची दैना उडवून दिली होती. आज दुसऱया दिवशीही पावसाचा जोर सुरू होता. पावसाने शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. शाळा सुटताना पाऊस सुरू झाल्याने विद्यार्थी, पालकांसह कामावरून परतणाऱया कर्मचाऱयांचीही तारांबळ उडाली होती. रात्रभर संततधार पाऊस कोसळत असल्याने गटार आणि छोटे-मोठे नाले ओसंडून वाहत होते. दरम्यान, पावसाने जिल्हा गारठला असताना पावसाने रब्बी पिकांची मशागत खोळंबली असून, काही ठिकाणी भात झडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात एकूण सरासरी 49.4 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात पिकांचे नुकसान
गेल्या दोन दिवसांपासून जिल्हय़ाला अवकाळी पाऊस झोडपत असून, यामध्ये फळबागांसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. माळशिरस, पंढरपूर, करमाळासह इतर तालुक्यातील द्राक्ष, डाळिंब, पेरू बागांना मोठा फटका बसला आहे. सोलापूर जिल्हय़ात ऑक्टोबरपासून अवकाळी पाऊस पडत असून, ढगाळ वातावरणामुळे शेतकऱयांना मोठय़ा संकटाला तोंड द्यावे लागत आहे. जिल्हय़ात बुधवारी आणि गुरुवारी 10 तासांहून अधिककाळ पाऊस पडत आहे. त्यामुळे द्राक्ष, डाळिंब, केळी व पेरूच्या बागेत पाणी साचले आहे.
नगरमध्ये गारठा वाढला; पिकांना फटका
नगर जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून अवकाळी पावसाची रिपरिप सुरू आहे. या पावसाचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसला असून, पिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसाने शेतकऱयांची चिंता वाढली आहे. नगर जिल्ह्यात श्रीरामपूर, संगमनेर, राहाता, राहुरी, नेवासासह रिपरिप सुरू होती.
पारनेर तालुक्यात शेकडो मेंढय़ांचा मृत्यू
पारनेर तालुक्यात बुधवारी रात्रभर झालेल्या वादळी वाऱयासह झालेल्या पावसामुळे व थंडीमुळे धनगर बांधवांच्या शेकडो मेंढय़ांचा मृत्यू झाला आहे. अवकाळी पाऊस, जोराचा वारा आणि सुरक्षित निवाऱयाचा अभाव यामुळे मेंढय़ा दगावल्या. किन्ही येथे बंडू कोळेकर, अंकुश कऱहे, बुधा कोळपे, बाबाजी कऱहे, बाबाजी टकले, सुभाष तांबे यांच्या 70 पेक्षा जास्त मेंढय़ा मरण पावल्या. तर पिंपळगाव रोठा येथेही मंदा खटके (रा. ढोकी) यांच्या 15 मेंढय़ा मरण पावल्या. वारणवाडी येथेही मेंढय़ा दगावल्याची घटना घडली.
कर्जतमध्ये 9 शेळय़ा दगावल्या
कर्जत अवकाळी पावसाने तालुक्यातील सिद्धटेक येथे नऊ शेळ्या दगावल्या आहेत. सिद्धटेक येथीव चार शेतकऱयांच्या नऊ शेळ्या गारठून मरण पावल्या आहेत. यामध्ये तानाजी पडळकर यांच्या तीन, साळू तांबे दोन, बाळू पडळकर दोन, वगा हीलीग यांच्या दोन शेळय़ांचा समावेश आहे, अशी माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे व कामगार तलाठी कालीचरण मखरे यांनी दिली आहे.
संगमनेरमध्ये 20 मेंढय़ांचा मृत्यू
नगर- पावसाच्या तडाख्यामुळे संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ व खंदरमाळवाडी शिवारात 20 मेंढया व कोकरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बुधवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका मेंढपाळांना बसला आहे. सतु सोडनर, संदीप जांबुळकर, संजु झिटे (सर्व रा. मांडवे बु. ता. संगमनेर) सिद्धु कोकरे (रा. चिंचेवाडी, साकुर), पोपट कुदनर (रा. शिंदोडी ता. संगमनेर), मारुती कुळाळ (रा. जांबुत बु.) यांच्या मेंढय़ांचा मृत्यू झाला आहे. मृत मेंढय़ांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याचे मेंढपाळ संजय झिठे यांनी सांगितले.
वडूजमध्ये 60 मेंढय़ांचा मृत्यू
वडूज- खटाव तालुक्यात बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने तीन गावांतील साठपेक्षा अधिक लहान-मोठय़ा शेळ्या, मेंढय़ांचा मृत्यु झाला. पावसाच्या तडाख्यात लोणी येथील रामचंद्र चव्हाण यांच्या 40 मेंढय़ा दगावल्या. वांझोळी येथील तानाजी मोटे यांच्या वाडय़ातील 13 मेंढय़ा, वाकेश्वर येथील नामदेव राऊत यांच्या तळातील सुनील साठे यांच्या दोन, सुखदेव गुजले यांच्या पाच व हरीदास मदने यांच्या चार मेंढय़ा दगावल्या आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खाडे, डॉ. प्रकाश बोराटे यांनी पाहणी करून मेंढय़ांचे शवविच्छेदन केले.
पाचगणीत 30 बकऱया दगावल्या
पाचगणी – बुधवारी रात्रभर झालेल्या पावसात भिरडाचीवाडी येथील मेंढपाळ शिवाजी धायगुडे, बापुराव बिचुकले व मारुती सूळ या मेंढपाळांच्या 30 बकऱया दगावल्या आहेत. वाईचे
स्ट्रॉबेरीवर रोगांचे आक्रमण
सातारा – सध्या सुरू असणाऱया पावसाने स्ट्रॉबेरी शेतीचे मोठे नुकसान झाले असून, स्ट्रॉबेरी हंगाम बहरायच्या वेळीच पीक विविध रोगांच्या अधिन झाल्याने स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी विवंचनेत सापडला आहे. महाबळेश्वर तालुका स्ट्रॉबेरीचे आगर म्हणून प्रसिद्ध आहे. यावर्षी तालुक्यात स्ट्रॉबेरी लागवडीचे क्षेत्रही मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. परंतु यावर्षी हंगामाच्या प्रारंभीच अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि धुक्याने स्ट्रॉबेरी पिकावर रोग वाढू लागले आहेत, तर पिकलेली स्ट्रॉबेरी ही खराब झाल्याने ती खाण्यायोग्य राहिली नाही. अवकाळी पावसाने स्ट्रॉबेरी पिकावर पावडरी भुरी आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, उत्पादित होणारी फळे सडून जाणार आहेत, असे स्ट्रॉबेरी तज्ञ किसन शेठ भिलारे यांनी सांगितले.तहसीलदार रणजित भोसले यांच्या आदेशानंतर बकऱयांचा पंचनामा करण्यात आला. देगावचे तलाठी गमरे यांनी अहवाल तहसीलदार यांना सादर केला. तसेच पावसामुळे हळद, ज्वारी, गहू आणि उसाच्या शेतात गुडघाभर पाणी साठल्यामुळे पिके जमीनदोस्त झाली आहेत.
पसरणी घाटात दरड कोसळली
वाई – वाई-महाबळेश्वर रस्त्यावर पसरणी घाटात आज पहाटे दरड कोसळली. यामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. बांधकाम विभागाकडून दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे वाई-महाबळेश्वर रस्त्यावर दत्तमंदिरनजीक पसरणी घाटामध्ये मोठी दरड कोसळली.




























































