
>> डॉ. अविनाश भोंडवे
कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असतानाच आणि तिसऱ्या लाटेचे भय कमी झाले असतानाच नवीन ‘ओमायक्रोन’ या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने दक्षिण आफ्रिकेत लाट पसरविल्याच्या बातम्या आल्या आहेत. इतरही काही देशांमध्ये या विषाणूने बाधित झालेले रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जगभरात पुन्हा एकदा कोरोनाची धास्ती निर्माण झाली आहे. हा नवा व्हेरियंट नेमका कसा आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत. तो किती घातक आहे, त्याविषयी काय काळजी घेतली पाहिजे याचा ऊहापोह करणारा लेख…
आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागात, जगप्रसिध्द कलाहारी वाळवंटाशेजारी असलेल्या बोट्स्वाना देशामधून मागील आठवड्यात एक चिंताजनक बातमी आली. ’ओमायक्रोन’ नावाचा कोरोनाचा नवा व्हेरियंट तिथे निर्माण झाला आहे. या विषाणूने बाधित झालेले रुग्ण दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग, नेदरलँडस्, जर्मनी, बेल्जियम अशा देशांत सापडू लागले आहेत. यामुळे या देशात पुन्हा कडक निर्बंध आले आहेत. इस्राएलने तर त्यांच्या देशात येणारी सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा थांबवली आहे. हिंदुस्थान सरकारनेदेखील याबाबत एक त्वरित बैठक बोलावून सर्व राज्यांना सावधगिरीचा इशारा दिला आणि परदेशातून येणारे विमान प्रवासी, टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, विलगीकरण याबाबतीत अनेक निर्देश दिले. या नव्या विषाणूचे शास्त्रीय नाव बी.1.1.529 असे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने त्याचे नामाभिधान ओमायक्रोन असे करून त्याला ‘व्हेरियंट ऑफ कन्सर्न’ (व्हीओसी) म्हणजे कोरोनाबाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल अशा म्युटेट झालेल्या नव्या व्हेरियंटरच्या यादीत तत्काळ समावेश केला.
काळजी का? भीती का नको?
या विषाणूची नोंद प्रथम 8 नोव्हेंबर रोजी झाली आणि गेल्या 3 आठवड्यात त्याच्याबद्दल केवळ प्राथमिक माहिती जाहीर झाली आहे. त्याचा सर्वांगीण अभ्यास होऊन तो कितपत धोकादायक आहे याबाबतचे संशोधन अहोरात्र सुरू आहे. त्यासाठी आणखी तीन-चार आठवडे नक्की लागतील.हिंदुस्थानसह जगभरातील देशांनी घेतलेले निर्णय याची साथ पसरू नये म्हणून घेतलेली खबरदारी आहे. महामारी पसरू नये यासाठी पाळल्या जाणाऱ्या तत्त्वांचा (प्रोटोकॉल) तो एक भाग आहे. हा विषाणूनंतर जर खरोखरच धोकादायक आहे असे दिसून आले तर साथ रोखण्यात उशीर नको म्हणून अशी खबरदारी घ्यावीच लागते. जानेवारी 2020 मध्ये अशी खबरदारी घेतली गेली नाही म्हणून कोरोनाची साथ वैश्विक पातळीवर पसरली होती. त्यातून घेतलेला हा धडा.
ओमायक्रोनची वैशिष्ट्येः जगभरात प्राथमिक अभ्यासात दिसून आलेल्या काही वैशिष्ट्यांमुळे तो जास्त खतरनाक आहे अशा बातम्या दिल्या जात आहेत.
या वैशिष्ट्यांमध्ये-
– ओमायक्रोनच्या स्पाईक प्रोटिनमध्ये 30 पेक्षा जास्त म्युटेशन्स झाली आहेत.
– यापैकी 2 म्युटेशन्समुळे तो शरीरातील पेशीत लवकर प्रवेश करतो.
– आणखी दोन प्रकारच्या म्युटेशन्समुळे तो एका व्यक्तीपासून दुसऱयाकडे वेगाने पसरतो.
– या असंख्य म्युटेशन्समुळे तो लसीमुळे निर्माण झालेल्या ऑण्टिबॉडीजना तसेच आधी झालेल्या कोरोनामुळे तयार झालेल्या ऑण्टिबॉडीजनादेखील दाद देत नाही. त्यामुळे ओमायक्रोनची साथ पसरली तर लस निष्प्रभ ठरेल.
चिंता का नको?
1) विषाणू जास्त वेळेस म्युटेट झाला म्हणजे जास्त धोकादायक असतोच, हे चुकीचे ठरू शकते. कारण अधिकाधिक म्युटेशन्समुळे विषाणूची बाधकता, मारकता आणि प्रसारक्षमता खुंटू शकते. 2) दक्षिण आफ्रिकेतील मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. अँजेलिक कोट्झी यांनी ‘ओमायक्रोनमुळे बहुतांशी रुग्णांमध्ये केवळ सौम्य लक्षणे दिसून आली आहेत.’ असे जाहीर निवेदन दिले आहे. 3) द. आफ्रिका आणि इतर देशांतील माहितीनुसार ओमायक्रोनने बाधित झालेल्या बहुसंख्य रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. ज्या बाधित रुग्णांना लक्षणे आहेत, त्यात सर्दी, ताप, खोकला हीच लक्षणे आहेत. मात्र खूप जास्त प्रमाणात अंग दुखणे, खूप गळून गेल्यासारखे वाटणे हे प्रमुख लक्षण अनेकांत दिसून आलेले आहे. गंभीर लक्षणे कमी रुग्णांत आढळली आहेत. 4) अमेरिकेच्या अध्यक्षांचे वैद्यकीय सल्लागार आणि तेथील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ अॅलर्जी अॅण्ड इन्फेक्शियस डिसिजेस या संस्थेचे प्रमुख डॉ. अँथनी फौसी यांनी सांगितल्याप्रमाणे या नव्या विषाणूच्या जनुकीय रचनेची मांडणी तपासणे आणि त्यावर अॅण्टिबॉडीजचा काय परिणाम होतो याचे संशोधन सुरू केलेले आहे. हा विषाणू वेगाने पसरत आहे हे दिसून येते आहे, पण या संबंधीचा अभ्यास पूर्ण झाल्यावरच ओमायक्रोनचा प्रसार किती वेगाने होतो, त्याची बाधकता आणि मारकता (पॉझिटिव्हिटी आणि ट्रान्समिसीबिलीटी) कितपत आहे हे कळू शकेल. 5) द. आफ्रिकेतून तो आंतरराष्ट्रीय प्रवासातून पसरला असावा या अंदाजानुसार काही निर्बंध घालण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून लसीकरणाचे प्रमाणपत्र आवश्यक होतेच, त्यात आता खबरदारी म्हणून 72 तासांतील ‘आरटीपीसीआर’ तपासणीचा निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक केलेला आहे. संशयास्पद लक्षणे असलेल्या आणि ओमायक्रोनचा प्रसार असलेल्या देशांतून येणाऱया रुग्णांना कदाचित 10 ते 14 दिवस विलगीकरणात राहावे लागेल. इस्राईल सोडता अन्य देशांनी आंतरराष्ट्रीय विमानसेवा थांबवलेली नाही. 6) ओमायक्रोन जगातील अनेक देशांत पसरला आहे, पण त्यामुळे 1 डिसेंबरपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही.
प्रतिबंधक उपाय
जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रोनला जरी काळजी निर्माण करणारा उत्परिवर्तित विषाणू म्हणून जाहीर केले असले तरी त्याबाबतचे प्रतिबंधक उपाय आधीचेच आहेत.
मास्क – आतून सर्जिकल मास्क आणि वरून कापडी मास्क असा नाक-तोंड पूर्ण झाकणारे दुहेरी मास्क वापरा. शारीरिक अंतर – सुयोग्य अंतर ठेवणे आता कदाचित जास्त आवश्यक असेल. मास्क काढून नाकातोंडाला हात लावण्यापूर्वी साबणपाण्याने किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवा. लक्षणे दिसल्यास डॉक्टरांना त्वरित दाखवा. टाळाटाळ न करता, त्वरित टेस्टिंग करून घ्या. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपका&त आपण अगदी थोडा काळ आला असाल तरी टेस्टिंग करून घ्या. आपण लसीचे दोन्ही डोस घेतले नसल्यास त्वरित लसीकरण पूर्ण करा. आपल्याला मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार किंवा कोणताही जुना कोमॉर्बिड आजार असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तो पूर्ण नियंत्रणात ठेवा. देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवास शक्य असल्यास टाळा.
ओमायक्रोन अजून हिंदुस्थानात आलेला नाही. पण जरी तो आलाच तरी हे प्रतिबंधक उपाय पाळल्यास, नव्या विषाणूमुळे कदाचित उद्भवू शकणारी तिसरी लाट येणार नाही. आणि रुग्णसंख्या थोडीफार वाढली तरी घाबरू नका, प्रतिबंधक उपाय आणि अधिकृत वैद्यकीय उपचारच आपले संरक्षण करतील.




























































